- अमोल खोब्रागडे
भटक्या आणि मोकाट गायींचे संगोपन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने गराडा येथील पशुप्रेमी समर्थ बडगे यांनी २००९ मध्ये स्वतःच्या तीन एकर शेतामध्ये वीणाताई बडगे गोरक्षण संस्थेची स्थापना केली. गाव परिसरातील मोकाट आणि निराधार गायींना आसरा देऊन गायींचे आरोग्य आणि पोषणाची जबाबदारी स्वीकारली.
भंडारा तालुक्यातील गराडा (बुज.) येथे मागील १५ वर्षापासून सुरु असलेल्या वीणाताई बडगे गोरक्षण सेवा संस्थेने केवळ गौरक्षणाचे कार्य केले नाही तर गावातील महिलांच्या हाताला रोजगारही दिला आहे. एकीकडे गोवंशाची सेवा आणि दुसरीकडे त्यातून रोजगार निर्मिती असा दुहेरी लाभ यातून साध्य झाला आहे. गावकऱ्यांनाही या कामातून आनंद आणि समाधान लाभत आहे.
या संस्थेत भारतीय गोवंशाच्या १४ जातींच्या गायीचे संगोपन केले जात असून, देशी गायीपासून दूध, दही, तूप याचे उत्पादन करून विक्री केली जाते. त्यामुळे ग्रामीण रोजगाराची संधी मिळाली आहे. येथील दूधजन्य पदार्थ शुद्ध असल्याने गाव परिसरात मोठी मागणी आहे.
गावातच रोजगाराची संधी
एरवि रोजगाराच्या नावाने ओरड असते. गावखेड्यावर तर हाताला नवे काम मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र या गावात गोरक्षण संस्थेमुळे गावातील २२ महिला व पुरुषांना बाराही महिने रोजंदारीवर काम मिळत आहे. पुरुषांना प्रतिदिन ३५० रुपये, तर महिलांना २०० रुपये मजुरी दिली जाते. गावकऱ्यांना गावातच रोजगार संधी मिळाली. स्वयंपूणर्णतेसोबतच उद्योगाचाही नवा मंत्र आणि मार्गही या निमित्ताने गावाला मिळाला आहे.
सेंद्रिय खताची गरज झाली दूर
गोशाळेत गायीपासून मिळणारे गोमूत्र, शेणाच्या गोवऱ्या आणि शेतीसाठी आवश्यक असलेली खते व जीवामृत उत्पादनांची निर्मिती होत आहे. शेतपिकासाठी सेंद्रिय खत उपयुक्त आहे. त्यामुळे ही गोरक्षण सेवा संस्था गावकऱ्यांसाठी रोजगाराचे साधन ठरत असून, देशी गायींचे संरक्षण, शेतकऱ्यांना नैसर्गिक खतांची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी मोलाचे योगदान देत असल्याचे समाधान गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
लहानपणापासूनच मला गौमातेची सेवा करण्याची प्रेरणा लाभली. त्यातूनच गोशाळा संस्थेची निर्मिती करण्याची जिद्द माझ्या मनात रुजली. या संस्थेद्वारे गौसेवा व गोरक्षणाबरोबरच युवक व महिलांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. गावातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे मार्गदर्शन करून रसायनमुक्त, निरोगी आणि फायदेशीर शेती पद्धतीला चालना देणे हे ध्येय आहे. गावकऱ्यांचे पाठबळ या प्रयत्नांना मिळत आहे.
- समर्थ बडगे, संस्थापक, वीणाताई गोरक्षण सेवा संस्था गराडा (बुज)