अझहर शेख
मंठा तालुक्यातील कानफोडी गावातील शेतकरी पवन राठोड यांनी आपल्या मेहनतीने आणि प्रेमाने वाढवलेल्या 'बिजल्या' या बैलामुळे सर्वत्र नाव कमावले आहे. केवळ मेहनत, प्रशिक्षण आणि शिस्त यावर आधारलेली त्यांची ही यशोगाथा आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. (Bijlya Bull Story)
'बिजल्या'ची किंमत तब्बल ११ लाख ११ हजार रुपये!
पवन राठोड यांनी तमिळनाडूहून केवळ १० महिन्यांच्या वयात ५१ हजार रुपयांना हा बैल विकत घेतला होता. कुशल देखभाल, पौष्टिक आहार आणि नियमित प्रशिक्षणामुळे 'बिजल्या' काही वर्षांतच शंकरपटात झळकू लागला. अखेर सांगली जिल्ह्यातील कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल तब्बल ११ लाख ११ हजार रुपयांना खरेदी केला. या विक्रीमुळे राठोड एका दिवसात लखपती शेतकरी बनले आहेत.
शर्यतींचा विजेता 'बिजल्या'
'बिजल्या' हा फक्त सुंदर आणि ताकदवानच नाही तर विजेता देखील आहे. शंकरपटातील ३० स्पर्धांपैकी २५ शर्यतींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जालना, वाशिम, परभणी, जिंतूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे त्याने आपली ताकद दाखवली असून या शर्यतीतून ३ ते ४ लाख रुपयांपर्यंतची कमाई झाली आहे.
आहार आणि प्रशिक्षणाची खास निगा
'बिजल्या'चा आहार दररोज खास ठेवला जातो.
सकाळी ३ लिटर दूध,
१०० ग्रॅम बदाम,
१ किलो उडीद डाळ,
सायंकाळी मका आणि गहू भरडा, असा पौष्टिक आहार दिला जातो.
दर दोन दिवसांनी गरम पाण्याने अंघोळ घालून त्याची निगा राखली जाते. सकाळी ७ वाजता २ किमी वर्कआऊट करून त्याला शर्यतीसाठी तंदुरुस्त ठेवले जाते.
घोड्यांनाही घाम फोडणारा बैल!
'बिजल्या'ने शंकरपटात घोड्यांसोबत भाग घेतला आणि पहिले स्थान पटकावले.
५ सेकंदांत ६० पॉइंट धावणारा हा बैल मराठवाड्यातील सर्वात वेगवान बैल म्हणून ओळखला जातो.
त्याची ताकद, तालमेळ आणि धावण्याचा आत्मविश्वास पाहून प्रेक्षक भारावून जातात.
सोशल मीडियावरही स्टार 'बिजल्या'
'बिजल्या' या नावाने इंस्टाग्रामवर पोस्ट होताच त्याचे ३ हजार फॉलोअर्स झाले. मैदानात धावताना लोक त्याला 'बिजल्या! बिजल्या!' म्हणून उत्साहात हाक मारतात. त्याच्या प्रत्येक शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मेहनत आणि चिकाटीचे प्रतीक
बैलावर प्रेम, शिस्तबद्ध आहार आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण यामुळेच 'बिजल्या' इतका मौल्यवान झाला. मेहनत आणि चिकाटीने शेतीतील प्रत्येक घटकातून यश मिळवता येते.- पवन राठोड, शेतकरी
'बिजल्या'ची कहाणी दाखवते की, समर्पण आणि जिद्द असेल तर यश कोणालाही गाठता येते.
