धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने एक मोठा निर्णय घेत २७ एप्रिल ते २८ मे या कालावधीत जनावरांचा बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बाजार समितीच्या आवारात शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर होणारी आवक आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या बाजार समितीत शेतीमालाची विक्रमी आवक होत असल्याने परिसरातील गर्दी नियंत्रणाबाहेर जात आहे. कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी सभापती यशवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त बैठक पार पडली. महिनाभराच्या या बंदी काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
१२ अंकी 'इअर टॅग' बंधनकारक
जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने आता 'इअर टॅग' अनिवार्य केला आहे. यापुढे बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक जनावराच्या (बैल, गोऱ्ह गाय, वासरू) कानाला १२ अंकी इअर टॅग असणे बंधनकारक राहील. बाजार समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी महिनाभर सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
इअर टॅगिंगचे फायदे :
- सरकारी योजना : शासकीय मदत, योजना आणि विम्याचा लाभ मिळवण्यासाठी.
- सुरक्षा : जनावरांच्या चोरी आणि तस्करीला आळा बसतो.
- आरोग्य : लसीकरण आणि उपचारांच्या नोंदी ठेवणे सोपे जाते.
- खरेदी-विक्री : जनावरांची खरेदी-विक्री पारदर्शक होते.
Solar Pump Yojana : सामायिक सातबारा असेल तर सोलर कृषि पंप योजनेचा लाभ मिळू शकतो का? वाचा सविस्तर
