Animal Husbandry Mobile App : शेतीव्यतिरिक्त, पशुपालनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. अनेक शेतकरी मोबाइल ॲप वापरून पशु आरोग्य, प्रजनन, आहार व्यवस्थापन, नोंदी ठेवणे आणि सरकारी योजनांची माहिती मिळवत आहेत. हे ॲप शेतकऱ्यांना अचूक माहिती देण्याचे काम करत आहेत. असेच तीन महत्वाच्या ॲपबद्दल माहिती देत आहोत, जे पशुपालकांना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
ई-गोपाला अॅपची वैशिष्ट्ये
गेल्या वर्षी पशुपालकांसाठी ई-गोपाला अॅप लाँच केले. ई-गोपाला अॅप शेतकरी आणि पशुपालकांसाठी खूप उपयुक्त आहे. हे अॅप पशुपालकांना तांत्रिक माहिती प्रदान करते, ज्यामुळे दुग्ध उत्पादकांना फायदा होतो आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सीमेन, गर्भ आणि खरेदी विक्रीबाबतची माहिती मिळते. ई-गोपाला अॅप आयुर्वेदिक पशुवैद्यकीय औषध आणि कमी किमतीच्या औषधी उपचारांबद्दल माहिती देते. तुम्ही हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. या अॅपमध्ये मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून वापरता येते.
फुले अमृतकाल पशुसल्ला मोबाईल अॅप
बदलत्या वातावरणात पशुधनाची काळजी घेण्यासाठी फुले अमृतकाल पशुसल्ला मोबाईल अॅप फायदेशीर ठरत आहे. हे अॅप महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्वदेशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राअंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध विज्ञान विभागाने विकसित केले आहे.
हे अॅप काय करेल?
हे अॅप शेतकऱ्यांना जनावरांमध्ये उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी वेळेवर मदत मिळवू देते. हे अॅप वापरण्यासाठी, गुगल प्ले स्टोअरवरून फुले अमृतकाल अॅप डाउनलोड करा. नोंदणी करा आणि तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. ओटीपी मिळाल्यानंतर, तुमचा पत्ता आणि स्थान एंटर करा आणि अॅप सुरु करा. तुम्हाला हवे असलेले गोठा किंवा ठिकाण निवडल्याने त्या ठिकाणाचे तापमान आणि आर्द्रता मिळेल. यामुळे गायींचा ताण ओळखण्यास आणि सल्ला देण्यास मदत होईल.
आयव्हीआरआय रोग नियंत्रण अॅप
अनेकदा जनावरांमधील आजार ओळखणे कठीण जाते. याच कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) आयव्हीआरआय रोग नियंत्रण अॅप फायदेशीर ठरते. हे अॅप लक्षणांवर आधारित जनावरांच्या आजारांबद्दल आणि ते कसे टाळायचे याबद्दल माहिती देते. पशुधन मालक हे अॅप त्यांच्या मोबाईल फोनवर गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात.
