नंदुरबार : सध्या जिल्ह्यातील तापमानात वारंवार बदल होत आहे. थंड व गरम वातावरणामुळे निश्चितच सर्वांच्या गोठ्यात गोचिडांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असणार. या गोचिडांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांना मोठ्या प्रमाणात गोचीड तापाची लागण होताना दिसते.
गोचीड तापामध्ये प्रामुख्याने बबेसिओसिस आणि ॲनाप्लास्मोसिस हे महत्त्वाचे आजार आहेत. थायलोरेसिस या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. संकरित गाई आणि म्हशीमध्ये हा रोग प्रामुख्याने आढळतो. म्हशीमध्ये लक्षणे सौम्य असतात. पण संकरित व विदेशी गायींमध्ये अतितीव्र लक्षणे आढळतात. अलीकडे शेळ्या व मेंढ्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे.
ज्यावेळी बाधित गोचीड निरोगी जनावरांना चावतो, त्यावेळी या रोगाचा संसर्ग व प्रसार होतो. या रोगाला कारणीभूत असणारे रक्त आदिजीवी (प्रोटोझुवा) यांच्या जीवनचक्रातील विशिष्ट टप्प्यातील जंतू ज्या वेळेला गोचिडाच्या शरीरात प्रवेश करून गोचीड बाधित करतात, त्यावेळी या थायलेरियासिसचा प्रादुर्भाव होतो.
अशी आहेत रोगाची लक्षणे
जनावरांना ताप येतो. पुढील व मागील पायाच्या फऱ्यासमोर असणाऱ्या लसिका गाठी (लिंफ नोड्स) सुजतात. सुरुवातीला जनावर खात असते; पण नंतर चारा खाणे बंद करतात. लाळ गळते. जलद व उथळ श्वासोच्छवास सुरू होतो. हळूहळू रक्तक्षय (ॲनिमिया) होतो. पुढे रक्तातील हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे गोठ्यातील, भिंतीवरील किंवा दावणीत मिळेल तेथे माती चाटण्याचा प्रयत्न करतात. वेळेत निदान व उपचार न झाल्यास जनावर दगावते.
जनावरांना या रोगाविरूद्ध लसीकरण करून घ्यावे
या रोगाच्या नियंत्रणासाठी गोचीड नियंत्रण हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. सोबत तीन महिन्यांवरील सर्व संकरित जनावरांना या रोगाविरुद्ध लसीकरण करून घ्यावे. ज्यावेळी आपण नवीन जनावर खरेदी करतो त्या-त्या वेळी ते जनावर गोठ्यात कमीत कमी २१ दिवस वेगळे बांधून त्यावर लक्ष ठेवावे. अंगावरील गोचीड निर्मूलन करून मगच मुख्य गोठ्यात आणावे.
