जळगाव :दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५० पैसे भावफरक जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे उत्पादकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असल्याचे दूध संघाने म्हटले आहे. उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेला नवीन पशुखाद्य कारखाना जिल्ह्यात लवकरच उभारण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
गेल्या काही वर्षातील तोटा भरून काढून संघाने २.२८ कोटींचा नफा मिळविला आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची सन २०२४-२५ या वर्षाची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी एका हॉटेलमध्ये संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
पशुखाद्य कारखान्याचे आधुनिकीकरण होणार
पातोंडा सोसायटीच्या प्रतिनिधींनी खाद्यातील बारली घटकामुळे जनावरांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा आढावा घेऊन त्याची विक्री थांबवण्याची मागणी केली. याप्रसंगी, विकास पशुखाद्याचे मातृ पोषण, हायएनजी शक्ती आणि बफेलो गोल्ड या तीन प्रकारच्या नवीन पौष्टिक पशुखाद्यांचे लाँचिंग झाले.
याप्रसंगी उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या संस्था, वैयक्तिक सदस्य आणि कर्मचाऱ्यांचा पुरस्कार करण्यात आला. तसेच, ५३ वर्षांपासून कामकाज पाहणारे सुभाष गंगाराम सोमवंशी (बाळद बु.), ४५ वर्षांपासून कार्यरत प्रकाश काशिनाथ होले (मस्कावद सीम) आणि २९ वर्षांपासून कार्यरत अनिता केवलदास पाटील (धानोरा) अशा ज्येष्ठ सचिवांचा प्रथमच संघाने सन्मान केला.
दूध संघाने ५० पैसे भाव फरक जाहीर केला. मुळात शेतकऱ्यांची मागणी एक रुपयाची होती, ती पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांचा भ्रम आणि रसनिराश झाला.
- प्रमोद पाटील, संचालक, दूध संघ