Join us

Khillar Cow : शेतकऱ्याच्या हौसेला मोल नाही; घातले खिल्लार गाईचे डोहाळ जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:31 IST

Khillar Cow फुलांनी सजवलेल्या मंडपात पै, पाहुणे नातेवाईक जमले.. अचानक जातिवंत खिलार गाय 'प्रिया'चे मंडपात आगमन होताच सर्वाचे लक्ष वेधले.. तिच्यावर पुष्पवृष्टी झाली.

सांगोला : फुलांनी सजवलेल्या मंडपात पै, पाहुणे नातेवाईक जमले.. अचानक जातिवंत खिलार गाय 'प्रिया'चे मंडपात आगमन होताच सर्वाचे लक्ष वेधले.. तिच्यावर पुष्पवृष्टी झाली.. तिला स्टेजवर आणून सुवासिनींनी तिची ओटी भरून पोटच्या मुलीप्रमाणे डोहाळ जेवणाचे कार्य पार पाडले. 

खिलारप्रेमी हनुमंत सुरवसे यांनी खिल्लार गायीचे डोहाळ जेवण घालून इतर पशुपालकासमोर आदर्श निर्माण केला आहे. गर्भवती महिलांचे डोहाळ जेवण करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे.

तीच प्रथा मुक्या जनावरांबाबत पाळली तर कोणालाही आश्चर्य वाटायला नको! अशाच प्रकारे सांगोला (खारवटवाडी) येथील खिल्लार प्रेमी हनुमंत शिवलिंग सुरवसे यांनी हा कार्यक्रम पार पाडला.

खिल्लार गाय प्रिया गर्भवती असल्याने हनुमंत सुरवसे यांनी तिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. मंगळवारी त्यांनी घरासमोर मंडप मारून स्टेज उभारला.

सकाळी तिला अंघोळ घातली. दरम्यान दुपारी १२ च्या सुमारास प्रियास मंडपातून स्टेजवर घेऊन येत असताना पाहुण्यांनी तिच्यावर पुष्पवृष्टी केली.

यावेळी कामिनी सुरवसे यांच्यासह सुहासिनींनी प्रियाला हळदी-कुंकू लावून तिची ओटी भरली. त्यानंतर उपस्थित पाहुणे मंडळींनी डोहाळ जेवणाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमास भाजपचे श्रीकांत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार, डॉ. निकिता देशमुख, कोल्हापूर (नेर्ली) येथील खिलार प्रेमी सागर पाटील, महादेव शिंदे, विजय गायकवाड, शरद मोरे, ज्योतीराम अवताडे तसेच खिल्लार प्रेमी ग्रुप कडलास महिला उपस्थित होते.

पुणे चॅम्पियनचा मान- हनुमंत सुरवसे यांनी गायत्री आणि प्रिया अशा दोन खिल्लार गायीचे संगोपन केले आहे.- त्यांनी खिल्लार गायीचे प्रमाण वाढावे म्हणून महाराष्ट्रातील पशुपक्षी कृषी प्रदर्शनात गायत्री व प्रिया दोन गायी सहभागी होतात.- पोटच्या मुलाप्रमाणे पाळलेल्या दोन्ही खिल्लार गायी देखण्या आणि समोरच्याला भुरळ पाडणाऱ्या अशा आहेत.- त्यांच्या दोन्ही गायींनी अवघ्या २० महिन्यांत भारतात (आदत जातीत) पुणे चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे.

अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी करा ह्या १० गोष्टी; वाचा सविस्तर

टॅग्स :गायशेतकरीशेतीमहाराष्ट्रबैलगाडी शर्यत