Join us

जनावरांना किरळ लागले हे कसे ओळखावे? व त्यावर तात्काळ काय उपाय करावेत? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:16 IST

कापलेल्या ज्वारीच्या सडातून फुटवे फुटतील. तेच फुटवे आपल्या जनावरांचा जीव घेऊ शकतात. यासाठी आपण सावध राहणं आवश्यक आहे.

आता जवळजवळ ज्वारीचा हंगाम संपला आहे. ज्वारी काढून कडबा देखील रचून ठेवला असणार. ज्वारी काढल्यानंतर चार दोन उन्हाळी पाऊस होतील. कॅनाॅलला पाणी सोडल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात अनियंत्रित वापर होईल.

त्यामुळे ज्वारीचे रान ओलं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग त्यातून कापलेल्या ज्वारीच्या सडातून फुटवे फुटतील. तेच फुटवे आपल्या जनावरांचा जीव घेऊ शकतात. यासाठी आपण सावध राहणं आवश्यक आहे.

ज्वारीची पेरणी केल्यानंतर किंवा पिक काढल्यावर फुटवे ज्यावेळी ते दीड ते दोन फूट उंचीचे होतात ते किंवा साधारण ४० दिवसाचे हे पीक जर जनावरांच्या खाण्यात आले तर जनावरांना विषबाधा होते. पशुपालकांना अनुभवातून हे माहीत आहेच.

पण अनेक वेळा चुकून लक्ष न दिल्यास उन्हाळ्यात जनावरे चरायला सोडली तर हिरवा वैरणीच्या कमतरतेमुळे जनावर अशा कोवळ्या फुटव्यावर तुटून पडतात. त्यातून मग जीवघेणी विषबाधा होते. खूप मोठे नुकसान हे पशुपालकांचे होत असते. 

ज्वारीच्या कोवळ्या फुटव्याने कशी होते विषबाधा?- फुटव्यामध्ये ग्लुकोसाइड नावाचे एक संयुग असते.- ते जनावरांच्या पोटातील जिवाणूवर परिणाम करून त्यातून हायड्रोसायनिक अॅसिड या विषाची निर्मिती होते.- ग्लुकोसाइडचे प्रमाण हे फुटव्याची उंची व वाढ आणि हवामानातील बदल यानुसार निश्चित होत असते.- शेतात नत्रयुक्त खते मोठ्या प्रमाणात वापरले असतील तरी देखील ग्लुकोसाइड प्रमाण वाढते.- साधारण २०० पीपीएम पेक्षा जास्त प्रमाण झाले तर विषबाधा होते.- फुटवे जर जास्त प्रमाणात खाण्यात आले तर मृत्यूचे प्रमाण वाढते.

विषबाधा झाल्यावर दिसणारी लक्षणे- अनेक वेळा तयार झालेले विष शोषण्यास विलंब झाला तर लक्षणे उशिरा दिसतात.- जनावर अस्वस्थ होते. श्वासोच्छ्वास वाढतो.- हृदयाचे ठोके वाढतात.- जनावर थरथर कापते. त्याला नीट उभे राहता येत नाही.- डोळ्याची आतील त्वचा लालसर दिसते.- डोळ्यातील बाहुली मोठी होते.- डोळ्यातून पाणी व लाळ गळते.- अनेक वेळा पोट फुगून जनावर गोल गोल फिरते.

कसे कराल उपचार- यासाठी तात्काळ उपचार मिळणे आवश्यक असते.- तज्ञ पशुवैद्यकाकडून सोडियम नायट्रेट, सोडियम थायोसल्फेट याचा योग्य प्रमाणात वापर करून सलाईन द्वारे देणे.- सोबत इतर पूरक औषधाचा वापर करून आपले जनावर आपण वाचवू शकतो.- असे प्रकार घडूच नये यासाठी अशा प्रकारच्या फुटवे फुटलेल्या शेतात जनावरे चरायला सोडू नयेत.- अशा शेतात शेतकाम करायचे असेल तर बैलांना देखील तोंडाला मुसके घालणे केव्हाही चांगले.- अशाच प्रकारची विषबाधा ही शेवंती, मेथी, कण्हेर, जवस, हिवराच्या शेंगा जर जनावरांच्या खाण्यात मोठ्या प्रमाणात आल्या तर होऊ शकते.- विशेष म्हणजे शेळ्या-मेंढ्यांमध्ये ही विषबाधा कमी प्रमाणात आढळते. घोडे व डुक्कर यांच्यात आढळत नाही. कारण त्यांच्या पोटातील आम्लामुळे ग्लुकोसाइडचा नाश होतो.

एकूणच पशुपालकांनी येणाऱ्या काळात अशा फुटवे फुटलेल्या शेता पासून आपली जनावरे दूर ठेवून होणारे नुकसान टाळावे.

डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: गायी-म्हैशी पान्हा का चोरतात? यावर काय कराल उपाय? वाचा सविस्तर

टॅग्स :गायदुग्धव्यवसायशेतकरीपीकपाऊसज्वारीशेळीपालन