प्रगतिपथावरील दुग्ध व्यवसायाने भारतासारख्या विकसनशील देशाला धवलक्रांतीच्या शिखरावर नेले आहे. या व्यवसायातील भारताची ही उन्नती आपल्याला निश्चितच अभिमानास्पद आहे.
दूध व्यवसायाचे आर्थिक गणित सर्वस्वी जनावरांच्या व्यवस्थापन कौशल्यावर अवलंबून आहे. जनावर हे काही यांत्रिक साधन नाही, ते सजीव आहे. त्याच्यामधील जनुकीय क्रियेद्वारे दूधनिर्मिती होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्याच्या बाबींचा अवलंब केल्यास, दुधाच्या उत्पादनात भरीव वाढ करता येते. प्रत्येक वेळेस केवळ व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता, दुधाळ जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन केल्यास भरपूर आर्थिक फायदा मिळू शकतो. यामध्ये योग्य नियोजन करणे मात्र आवश्यक ठरते. ज्यावेळी वासरू मातेच्या गर्भाशयात वाढत असते, त्यावेळी त्याला अन्नाचा पुरवठा हा मातेच्या रक्तातून होत असतो. त्यामुळे गर्भाशयातील वासरू वाढत असते. पण ते ज्यावेळी गर्भाशयातून बाहेरच्या वातावरणात येते त्यावेळी त्याला अतिशय भिन्न अशा वातावरणाचा, परिस्थितीचा सामना करावा लागतो. यामुळेच नवजात वासरांचे संगोपन महत्त्वाचे आहे. नवीन जन्मलेल्या वासरावरच पुढील पिढी अवलंबून असते.
पहिले चार महिने काटेकोर निगराणीचे
जन्मल्यानंतर पहिल्या एक ते चार महिन्यांपर्यंत वासरामध्ये मृत्यूदर जास्त दिसून येतो. यामुळे याच काळात लक्ष देणे गरजेचे असते. गाय व्याल्यानंतर ती नवजात वासराला थोडा वेळ चाटून स्वच्छ करते. यानंतर वासराचे नाक, तोंड पुसून स्वच्छ करावे. प्रथम वासराच्या नाका-तोंडातील चिकट पदार्थ नीट काढावा. वासराला कपड्यांनी स्वच्छ पुसून कोरडे करावे. वासराला आरामशीरपणे श्वास घेता यावा म्हणून छातीची हलकी मालिश करावी. वासराला स्तनपान सुरू करण्यास मदत व्हावी म्हणून त्याच्या तोंडात दोन बोटे घालून ती त्याच्या जिभेवर ठेवावीत. वासराच्या संगोपनाच्या दृष्टिकोनातून वासराची नाळ कापणे हितकारक असते. कारण वासराची नाळ वासरू बांधलेल्या ठिकाणी घाणीत अथवा शेणात लोळत असते, त्यामुळे त्या नाळेद्वारे जंतूंचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. बऱ्याच वेळा गायी वासराच्या नाळेला चाटतात, त्यामुळे तिला इजा होते. नाळेच्या वासामुळे कुत्र्यासारखे प्राणी वासराची नाळ ओढतात अथवा चावा घेऊ शकतात. या सर्व गोष्टींपासून वासराचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून नाळ कापणे अत्यावश्यक असते. नाळ कापताना नाळेला पोटापासून २- ३ इंच अंतरावर धाग्याने बांधावे. उरलेली नाळ कात्रीने कापून टाकावी. नाळ कापलेल्या ठिकाणी टिंक्चर आयोडिन लावावे. वासराचे कोवळे, लांब अनावश्यक खुर खुडावेत. नवजात वासरू उभे राहण्याचा सतत प्रयत्न करत असते त्यावेळी आधार द्यावा.
जन्मानंतर अर्ध्या तासात चीक पाजावा
वासरू जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासात चीक पाजणे आवश्यक आहे. तत्पूर्वी व्यालेल्या गाईंचा मागील भाग: कोमट पाण्याचे स्वच्छ धुऊन काढावा, नंतर चीक काढावा. असा ताजा चीक वासराच्या वजनाच्या दहा टक्के म्हणजे आवश्यकतेनुसार साधारणपणे २४ तासांच्या कालावधीत दोन ते तीन लिटर इतका पाजावा. चिकातून रोगप्रतिकारक शक्तीचे घटक मिळतात. वासरू दगावण्याचा धोका टळतो. चीक सारक म्हणून काम करतो. चिकात भरपूर सत्त्वांश उदा. प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे असतात. जन्मतः वासराच्या वजनाची नोंद घ्यावी. शिंगकळ्या १०-१५ दिवसांत काळजीपूर्वक जाळून घ्याव्यात. वासरांना पहिला एक महिना शक्यतो दुधावरच वाढवावे. कोवळे दूध पाजल्याने वासरे सशक्त व निरोगी राहतात. अशा वासरांची वाढ झपाट्याने होत असते. खनिजयुक्त चाटण विटा ठेवाव्या. वासरू बांधायची जागा-गोठा कोरडा आणि स्वच्छ असावा. ही जागा हवेशीर, ऊन थंडीपासून सुरक्षित असावी. वासराला वरून दूध पाजण्याची सवय लावा. यामुळे त्याला वजनाच्या १०% दूध मिळेल, तसेच गाय किती दूध देते ते सुद्धा समजेल.
संगोपनाच्या दोन पद्धती
वासरू संगोपनाच्या दोन पद्धती आहेत. एक मातृत्व पद्धत. या पद्धतीमध्ये वासराला गाईबरोबरच ठेवून दूध काढण्याअगोदर थोडा वेळ व काढल्यानंतर थोडा वेळ दूध पिण्यासाठी सोडतात. या पद्धतीमध्ये वासरांना शुद्ध स्वरुपात दूध मिळते. गाय-वासराची माया वाढून वासरू चांगले पोसते. दूध पाजताना जंतूंच्या शिरकावाबद्दल जास्त भीती नसते कारण दूध नैसर्गिक स्थितीमध्ये मिळते. परंतु या पद्धतीचे तोटेही आहेत. या पद्धतीत गाईचे एकूण दूध उत्पादन समजत नाही. अचानक वासरू मेले तर गाय दूध देणे बंद करते. दुसरी पद्धत आहे दाईत्व पद्धत. या पद्धतीत वासरू जन्मापासूनच आईपासून वेगळे बांधतात. यात स्वच्छता व मोकळीक हे हेतू आहेत. या पद्धतीत अपघाताने वासरू मृत्यू पावले तरी गाय दूध देते. वासराला मोजून पाहिजे तेवढे दूध पाजता येते. वासरापासून गाईच्या सडाला होणाऱ्या जखमा टाळता येतात. वासरांना केव्हाही विकता येते. या पद्धतीमध्ये दूध पाजताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण दुधाचे तापमान वासराच्या तापमानाइतके व्हायला पाहिजे व एकूण दूध हे शरीराच्या वजनाच्या १/१० पटीने असले पाहिजे.
खाद्याची सवय लावण्याची रीत वयाच्या तीन आठवड्यानंतर वासरांपुढे थोडे गवत टांगावे. गवत, खाद्य चघळता चघळता वासराच्या पहिल्या पोटाची नैसर्गिक कार्यक्षमता वाढते. सहा आठवड्यानंतर थोडे थोडे खाद्य (आंबोण) द्यावे, नंतर ते वयाप्रमाणे रोज अर्धा ते एक किलो देत जावे. वासरांना सतत एका जागी बांधू नका, डास, माशा, गोचिडांचा उपद्रव टाळावा. महिन्यात एकदा गोचिडनाशक देत जावे. बासरांना कृमिनाशक औषधे दर तीन महिन्यांनी द्यावीत. वासरांना वयाच्या तीन महिन्यांनंतर फऱ्या, घटसर्प, लाळ खुरकुत व आय. बी. आर. च्या रोगप्रतिबंधक लसी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार टोचून घ्याव्या. संतुलित आहार द्यावा. त्यात धान्य, डाळी, प्रथिनयुक्त पेंड, भुसा, चुनी यांचा समावेश करावा. गाईंचा आहार वासरांना देऊ नये. एक महिन्यानंतर वासरास कोवळा हिरवा चारा आणि दररोज सुमारे १०० ग्रॅम बाल आहार देण्यास सुरुवात करावी. वासराच्या जन्मापासून वय तसेच वजनानुसार खाद्यघटकांची रोजच्या गरजेनुसार योजना करावी. वासरांना स्वच्छ व भरपूर पाणी पाजावे.. पहिल्या आठवड्यानंतर वासरू पाणी प्यायला लागते. आजची कालवडच उद्याची गाय आहे. यामुळे दुग्धोत्पादनात वासरांच्या संगोपनाला फार महत्त्व आहे.
आजारांना प्रतिबंध करणे आवश्यक
वासरांना नियमित होणारे आजार हगवण, न्युमोनिया, थायलेरियासिस, गोलकृमींचे संक्रमण असे आहेत. वासरांना वेळीच चीक पाजला तर हगवण सहसा लागत नाही. यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. न्युमोनिया आजाराची लक्षणे म्हणजे ताप येणे, नाकामधून द्रवपदार्थ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा येणे ही आहेत. वेळीच उपचार केला नाही तर वासरू दगावते. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने अशी लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करावा. या रोगाच्या प्रतिबंधासाठी वासरांचा थंडी व वाऱ्यापासून बचाव करावा. गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्यामध्ये ओलावा, दमटपणा राहणार नाही याची काळजी घ्यावी. थायलेरियासिस हा आजार एकपेशी आणि परजीवींपासून होतो. गोचिडांमार्फत तो रक्तात पसरतो. या आजारात वासरांना ताप येतो, श्वसनास त्रास होतो, अशक्तपणा, लसिका ग्रंथीची वाढ होते. पशुवैद्यकाकडून त्वरित उपचार करून घ्यावा. प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे गोठ्यातील सर्व जनावरांतील गोचिड निर्मूलन करून घ्यावे. जंतांच्या प्रादुर्भावामुळे वासरे अशक्त होतात. यावर उपाय म्हणजे जंतनाशक औषधीचा वापर योग्य वेळी करावा. दर तीन महिन्यांनी जंतनाशक औषधांची मात्रा वासरांना द्यावी. अशा प्रकारे वासरांचे काळजीपूर्वक संगोपन करावे.
डॉ. स्मिता कोल्हे
प्रमुख संशोधन विभाग
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, सातारा