Join us

जनावरांच्या पोटात जंत झाले आहेत हे कसे ओळखाल? काय कराल उपाय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:57 IST

janavratil jant nirmulan जनावरांचे आरोग्य आणि उत्पादकता जर अबाधित ठेवायची असेल तर नियमित आपल्या सर्व जनावरांना, पाळीव पक्षांना नियमित जंताचे औषध देणे अत्यंत आवश्यक आहे.

जनावरांचे आरोग्य आणि उत्पादकता जर अबाधित ठेवायची असेल तर नियमित आपल्या सर्व जनावरांना, पाळीव पक्षांना नियमित जंताचे औषध देणे अत्यंत आवश्यक आहे. जंताचे औषध हे नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच देणे फायदेशीर ठरते.

अनेक वेळा आपण आपल्या मनाने औषध दुकानातून जंताचे औषध खरेदी करतो त्याचा वापर करतो. वापर करताना त्याची योग्य मात्रा वापरली जातेच असे नाही. त्यामुळे जंताच्या औषधांना दाद न देणारे जंत अलीकडे निर्माण होत आहेत ही वस्तुस्थिती आहे.

जनावरांना जंत झाल्यावर दिसणारी लक्षणे◼️ गोल कृमी, चपटे कृमी, पर्णकृमी अशा वेगवेगळ्या प्रकारचे जंत असतात.◼️ त्यांच्या प्रादुर्भावामुळे ते जनावरांच्या पोटातील अन्न व रक्त शोषण करून फार मोठे नुकसान पोहोचवतात.◼️ वासरे, व रेडके यांची यामुळे वाढ खुंटते.◼️ जनावरांची भूक कमी होते व उत्पादन घटते.◼️ जनावरे वेळेवर माजाला येत नाहीत. सोबत प्रतिकारशक्ती कमी होते.◼️ जनावरे वारंवार आजारी पडतात.◼️ शेण पातळ टाकतात. शेणाला घाण वास येतो.◼️ अंगावरील चमक कमी होते. केस राठ होतात.◼️ जनावरांनी खाल्लेले १८ ते २७% अन्न व अन्न रस जंतच खाऊन टाकतात.◼️ जंताच्या प्रादुर्भावामुळे मोठी जनावरे क्वचितच मरण पावतात त्यामुळे पशुपालक याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

कसे कराल जंत निर्मूलन◼️ मोठ्या जनावरांमध्ये कमीत कमी वर्षातून दोन वेळा पावसाळ्यापूर्वी आणि हिवाळ्याच्या मध्यावर जंतनाशके देऊन घ्यावीत.◼️ जंतनाशके देण्याचे वेळापत्रक ठरवताना आपले व्यवस्थापन कसे आहे आणि कोणत्या भागात आपला गोठा आहे यावर ठरवावे.◼️ काही भागात वारंवार जंताचा प्रादुर्भाव होत असेल तर जंताचे औषध वारंवार द्यावे लागते.◼️ त्यासाठी आपल्या गोठ्यातील मोठ्या व लहान वासराचे शेण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून तपासून घ्यावे. त्याप्रमाणे नेमके औषध आपल्या जनावरांना द्यावे.◼️ जंताचा प्रादुर्भाव असेल तर मान्सूनपूर्व केलेल्या लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येत नाही. आता मान्सूनपूर्व लसीकरण सुरू होत आहे.◼️ त्यापूर्वी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून आपल्या सर्व जनावरांना जंताचे औषध उपलब्ध करून घ्यावे. त्याच्याच सल्ल्याने त्याचा वापर करावा.◼️ याचा वापर केल्यास सर्व पशुधनाचे आरोग्य चांगले राहण्यासह मान्सूनपूर्व लसीकरणामुळे चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होईल.◼️ त्यासाठी तात्काळ जंत निर्मूलनासाठी सर्व पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील काही जनावरांचे शेण काडीपेटीतून किंवा प्लास्टिक पिशवीतून साधारण २० ते ३० ग्रॅम दवाखान्यात घेऊन जावे.◼️ पशुवैद्यकीय अधिकारी योग्य त्या पद्धतीने तपासणी करून नेमक्या औषधाचा पुरवठा करतील किंवा औषध लिहून देतील. त्याचाच वापर करणे अपेक्षित आहे.◼️ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांनी यासाठी शिबिराचे आयोजन केले तर निश्चितपणे त्यामध्ये आपला सहभाग नोंदवा.

आपली जनावरे जंतमुक्त करून घ्या. त्यामुळे मान्सूनपूर्व लसीकरणाचा चांगले परिणाम दिसून येतील. आपली जनावरे अनेक रोगापासून दूर राहतील यात शंका नाही.डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: जनावरांना कासेचे आजार होऊ नये म्हणून दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर हे करायला विसरू नका

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधशेतकरीआरोग्यमोसमी पाऊस