पुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे.
राज्य सरकारने जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांचे आतापर्यंत ५३७ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे.
तर पुढील तीन महिन्यांच्या अनुदानापोटीचे ७५८ कोटी रुपये नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले असून, सरकारकडून हा निधी आल्यानंतर शेतकऱ्यांना व्यतिरिक्त करण्यात येईल, अशी माहिती दुग्ध व्यवसाय आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली.
पशुधन सांभाळण्यासाठी दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. त्या तुलनेत गायीच्या दुधाला अपेक्षित भाव मिळत नाही. परिणामी, दूध उत्पादकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने गायीच्या प्रतिलिटर पाच रुपये याप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे.
त्यानुसार राज्य सरकारने जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी राज्यातील ६ लाख २२४ शेतकऱ्यांना ५३७ कोटी ८५ लाख ३० हजार ८५ रुपयांचे अनुदान थेट खात्यावर जमा केले आहे. हे अनुदान सहकारी संघ, संस्था, प्रकल्प, शेतकरी उत्पादक कंपन्या, शीतकरण केंद्र यांच्या माध्यमातून दिले जात आहे.
सर्वाधिक शेतकरी अहिल्यानगरमध्ये• या अनुदानाचा सर्वाधिक लाभ अहिल्यानगर जिल्ह्यातील २३१ संघ व प्रकल्पांना झाला असून, त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार २९९ शेतकऱ्यांना झाला. त्यांना १५२ कोटी १२ लाख ३० हजार ५९० रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.• त्याखालोखाल पुणे जिल्ह्यातील ९८ संघ व प्रकल्पांमधून १ लाख ४३ हजार ४६३ शेतकऱ्यांना १७२ कोटी ८१ लाख ४ हजार ९६५ रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.• नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुढील तीन महिन्यांसाठीच्या अनुदानापोटी राज्य सरकारने ७५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारकडून ही रक्कम प्राप्त होतात सर्व संबंधित शेतकऱ्यांना त्याचे वितरण करण्यात येईल, असेही मोहोड यांनी स्पष्ट केले.
भुकटी प्रकल्पांनाही अनुदान• राज्य सरकारने दूध भुकटी व बटरचे कोसळलेले दर विचारात घेता दूध भुकटी निर्यातीसाठी ३० रुपये प्रतिकिलो किंवा रूपांतरणासाठी दीड रुपया प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत एकूण ३२ खासगी व सहकारी प्रकल्पांनी सहभाग घेतला आहे.• सहभागी प्रकल्पांपैकी १३ दूध भुकटी प्रकल्पांनी आपली माहिती सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केल्यामुळे त्यांनी रूपांतरित केलेल्या २६ कोटी ८५ लाख ७४ हजार ५४१ लिटर दुधाच्या रूपांतरणाकरिता ४० कोटी २८ लाख ६१ हजार ७९३ रुपये प्रोत्साहनपर अनुदान डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित अनुदान देखील लवकरच देण्यात येणार असल्याचे मोहोड यांनी सांगितले.
जिल्हानिहाय वितरण झालेले दूध अनुदान
जिल्हानिहाय | शेतकरी | अनुदान |
पुणे | १,४३,४६३ | १७२,८१,०४,९६५ |
अहिल्यानगर | १,७३,२९९ | १५२,१२,३०५९० |
अमरावती | ५९४ | १८,५४,२८० |
बुलढाणा | ५५९ | १४,८०,६७० |
कोल्हापूर | ७०,२७० | २६,७०,५५,६१५ |
सांगली | ३८,९७४ | २२,३९,७४,४५० |
सातारा | ३७,९४६ | ३९,६७,१०,३९० |
सोलापूर | ६०,२२५ | ७५,६५,९९,६९५ |
नाशिक | २४,६८६ | १७,०५,७२,७६५ |
धुळे | ४०१ | २०,६३,०६५ |
जळगाव | १२,५६९ | ५,०८,७४,५७५ |
नागपूर | २,४६२ | ७९,०३,४७५ |
वर्धा | ३३० | ५,७३,८०५ |
भंडारा | ४९२ | १७,०९,७६० |
छ. संभाजीनगर | १४,६९२ | १०,५६,४४,५९० |
बीड | ८,६३३ | ६,५९,५०,०७५ |
जालना | १,०१३ | ३१,७९,१२५ |
धाराशिव | १०,७१७ | ६,९२,२६,६४५ |
लातूर | ४५७ | ३३,८१,३२५ |
नांदेड | ३६ | ४६,७१० |
परभणी | ५६ | ३,९३,५१५ |
एकूण | ६,०२,१४४ | ५३७,८५,३०,०८५ |
येत्या आठवडाभरात हा निधी येण्याची शक्यता असून, त्याचे तातडीने वितरण करण्यात येईल. - प्रशांत मोहोड, आयुक्त, दुग्ध व्यवसाय विभाग
अधिक वाचा: Gochid Niyantran : जनावरांतील गोचीडांच्या नियंत्रणासाठी टॉप टेन उपाय; वाचा सविस्तर