Join us

हरभऱ्याच्या कुटाराला सुगीचे दिवस; जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:06 IST

दिवसेंदिवस बाजारपेठेत हरभऱ्याचे दर कमीच होत आहेत. परंतु, हरभऱ्यापासून निघणारे कुटार मात्र यंदा भाव खात आहे. जनावरांच्या चाऱ्याकरिता हरभऱ्याच्या कुटाराचा मोठ्या प्रमाणात शेतकरी, पशुपालक वापर करतात.

रामेश्वर बोरकर

दिवसेंदिवस बाजारपेठेत हरभऱ्याचे दर कमीच होत आहेत. परंतु, हरभऱ्यापासून निघणारे कुटार मात्र यंदा भाव खात आहे. जनावरांच्या चाऱ्याकरिता हरभऱ्याच्या कुटाराचा मोठ्या प्रमाणात शेतकरी, पशुपालक वापर करतात.

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील निवघा तळणी कोळी परिसरात रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे कुटारही भरपूर असल्याने अकोला, अमरावती, नागपूरचे व्यापारी कुटार खरेदीकरिता दाखल झाले आहे. 

दोन ते अडीच हजार रुपये एकरप्रमाणे हरभऱ्याचे कुटार खरेदी करत आहेत. परिसरातून रोज दहा ते पंधरा ट्रॅक्टर भरून कुटार अकोला, अमरावती, नागपूरला जात आहे.

काही वर्षांपूर्वी हरभऱ्याचे कुटार कोणीच खरेदी करत नव्हते, तेव्हा ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे नाहीत ते मोफत दुसऱ्याला देत होते. मात्र यंदा अनेक परिसरात चारा टंचाई सदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने आता पासून अनेक व्यापारी, शेतकरी, पशुपालक सुक्या चाऱ्याचा साठा करून ठेवत आहे.

दरम्यान कुटार विक्री होत असल्याने आता मात्र परिसरातील शेतकरी कुटाराची काळजी घेत आहेत. या कुटार खरेदी विक्रीच्या व्यवसायातून स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. तर कुटार विक्रीतून शेतकऱ्यांचा देखील हरभरा उत्पादनाचा खर्च कमी होत आहे.

हेही वाचा : गोवर्धनरावांच्या गोठ्यातील बकरीने पाचव्यांदा दिला पाच पिल्लांना जन्म; परिसरात चर्चेचा विषय ठरतेय बकरी

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेती क्षेत्रशेतीशेतकरीनांदेडमराठवाडाविदर्भ