Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gokul Milk : सर्वाधिक दूध खरेदी दर देणारा 'गोकुळ' संघ देणार 'अमूल'ला टक्कर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 15:40 IST

Gokul Milk : 'अमूल'ने आमच्या कार्यक्षेत्रात घुसून म्हैस दूध संकलन सुरू केले होते. मात्र, आम्ही ते थोपवले असून देशाच्या बाजारपेठेत त्यांना टक्कर देण्यासाठी 'गोकुळ'ने सज्ज राहावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कोल्हापूरच्या म्हैस दूधाची गुणवत्ता चांगली असल्याने मुंबईच्या बाजारपेठेत 'गोकुळ'च्या दुधाने ग्राहकांना भुरळ पाडली आहे. ते पाहून 'अमूल'ने आमच्या कार्यक्षेत्रात घुसून म्हैस दूध संकलन सुरू केले होते. मात्र, आम्ही ते थोपवले असून देशाच्या बाजारपेठेत त्यांना टक्कर देण्यासाठी 'गोकुळ'ने सज्ज राहावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

'गोकुळ'चे शिल्पकार आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सतेज पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंत्री मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबीटकर, खासदार शाहू छत्रपती यांचा सत्कार करण्यात आला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात सर्वाधिक दूध खरेदी दर देणारा 'गोकुळ' संघ असून सामान्य शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा आणि घामाला दाम देण्याची भूमिका आहे. मुंबई प्रमाणेच पुणे मार्केटकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर म्हणाले, गुणवत्तेच्या बळावर 'गोकुळ'ने देशपातळीवर आपले नाव तयार केले असून अभिमान वाटेल, असा कारभार सुरू आहे.

आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या प्रेरणेतून काम चालू ठेवा. आमदार सतेज पाटील म्हणाले, जिल्हा बँकेसह 'गोकुळ' आम्ही राजकारण विरहित चालवत असल्याने त्यांची प्रगती नेत्रदीपक आहे. गेल्या चार वर्षांत २५०० कोटींवरून ४ हजार कोटींपर्यंत उलाढाल झाली असून याचे सगळे श्रेय दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आहे.

वीस लाख लिटरचा टप्पा पार करायचाच या ईर्षेने संचालकांनी नियोजन करावे, सोलापूरला सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण होत असून ग्राहकांवर बोजा न टाकता शेतकऱ्यांना जादा दर द्यावा.

'गोकुळ' हा महाराष्ट्राचा बॅन्ड करणे हीच आनंदराव पाटील-चुयेकर यांना खरी श्रद्धांजली असेल. यावेळी खासदार शाहू छत्रपती, 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची भाषणे झाली. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी स्वागत केले. संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले.

कोल्हापुरात 'गोकुळ'च्या वतीने शुक्रवारी दूध प्रकल्प येथे लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल खासदार शाहू छत्रपती यांचा सत्कार अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी एस.आर. पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील, अजित नरके, प्रा. किसन चौगले, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, डॉ. सुजीत मिणचेकर, युवराज पाटील, बाळासाहेब खाडे, अंजना रेडेकर, स्मिता गवळी, प्रकाश पाटील उपस्थित होते.

'आयव्हीएफ' बद्दल व्यक्त केली नाराजी

संघाचा कारभार चांगला आहे; पण 'आयव्हीएफ'मध्ये संचालकांनी चांगले काम केलेले नाही. महागड्या म्हैशी खरेदी केल्यानंतर त्या वेळेत गाभण जाऊन त्यांनी रेडीच दिली पाहिजे, यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे असून याकडे लक्ष देण्याची सूचना मंत्री मुश्रीफ यांनी केली.

आबाजींचा 'अमृतमहोत्सवी' सत्कार होणार

ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त येत्या वर्षभरात सत्कार करणार आहे. शंभराव्या वाढदिवसाचा सत्कार करूया, असे मुश्रीफ म्हणताच, आबाजी शंभर वर्षांपर्यंत राहतील. आमची काही गारंटी नसल्याने त्यांनी हा सत्कार स्वीकारावा, असे अध्यक्ष डोंगळे म्हणाले.

हेही वाचा : न घेतलेल्या कर्जाचा झाला डोंगर अन् सुरू झाली कहाणी कारखान्याच्या विक्रीची ..

टॅग्स :गोकुळदूधहसन मुश्रीफकोल्हापूरदुग्धव्यवसायशेतकरीशेती क्षेत्र