Join us
Daily Top 2Weekly Top 5

Fodder Production : चारा उत्पादनात हा जिल्हा राज्यात भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 16:51 IST

वैरणीची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मका व ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप केले. या उपक्रमास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत कसदार, उत्तम प्रतीच्या हिरव्या चाऱ्याचे उत्पादन केले.

आयुब मुल्लाखोची: वैरणीची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मका व ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप केले. या उपक्रमास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत कसदार, उत्तम प्रतीच्या हिरव्या चाऱ्याचे उत्पादन केले. त्यामुळे चाराटंचाईची धग कमी होण्यास मदत झाली.

जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या काळात २ कोटी रुपयांच्या ७२ हजार किलो बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते. डिंसेबरमध्येसुध्दा आणखी बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

त्यामुळे हिरवा चारा उपलब्ध होईलच; परंतु त्याची साठवणूक करून मुरघाससुद्धा तयार करता येणार आहे. वैरण उपलब्ध करण्याच्या या प्रयोगात राज्यात जिल्हा आघाडीवर राहिला आहे.

गतवर्षी पाऊस कमी झाल्याने राज्यात बहुतांश ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती होती; त्यामुळे भविष्यात वैरणीची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन अधिक सतर्क झाले.

जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून वैरण बियाणे मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला जुनमध्ये खरीप हंगामात त्याची सुरुवात केली. ऑक्टोबरपर्यंत दोन टप्प्यांत ७२ हजार १०० किलो बियाणे वाटले.

सुमारे १३ हजार शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तिसऱ्या टप्प्याची सुरुवात डिसेंबरच्या अखेरीस करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ३२ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

मका बियाण्यास मागणीमका बियाण्यास जास्त मागणी आहे. याचे उत्पन्न हेक्टरी ६५ टन असून ते पन्नास दिवसात निघते, तर ज्वारीचे उत्पन्न हेक्टरी ३० टन आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ३ ते ४ जनावरे आहेत, त्यांना प्राधान्याने याचे वाटप केले आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळ, महाबीज यांच्याकडून खरेदी केलेल्या बियाण्यांचे वाटप केले असल्याने हिरव्यागार, दर्जेदार चाऱ्याची निर्मिती झाली आहे.

जिल्ह्यात ८ लाख ५२ हजार पशुधन- जिल्ह्यात ८ लाख ५२ हजार १ पशुधन (म्हैस वर्ग - ५ लाख ६८ हजार ३६३, तर गाय वर्ग २ लाख ८३ हजार ६३७) आहे. सुमारे बावीस लाख लिटरहून अधिक दुधाचे संकलन होते.- १३९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या ठिकाणी बियाणे देण्याचे काम केले आहे. सगळ्यात जास्त बियाणे करवीर व हातकणंगले या दोन तालुक्यात वाटप झाले आहे.

चांगल्या प्रतीच्या दुधाचे उत्पादन वाढणे आणि पशुधनाला पुरेशी वैरण उपलब्ध व्हावी, यासाठी ही योजना राबविली जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यासाठी प्रतिसाद दिला आहे. १०० टक्के अनुदानावर बियाणे दिले जाते. शेतकऱ्यांनी या योजनेचा आणखी लाभ घ्यावा. - डॉ. प्रमोद बाबर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

अधिक वाचा: गाई-म्हशीतील संसर्गजन्य गर्भपात कशामुळे होतो व तो कसा टाळता येईल?

टॅग्स :कोल्हापूरदुग्धव्यवसायपीकमकाशेतकरीशेतीदूध