Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीचे उत्पादन कमी असल्याने कडब्याचे दर कडाडले; चाऱ्यासाठी पशुपालकांची होतेय वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 15:05 IST

उन्हाळ्यास सुरुवात झाली तसे चाराटंचाई जाणवू लागली आहे. यंदा ज्वारीचे उत्पादन कमी असल्याने कडब्याचे दर शेकडा तीन ते चार हजारांवर पोहचले आहेत. शिवाय ओल्या चाऱ्याची अशीच अवस्था आहे. ओल्या-वाळलेल्या चाऱ्यासाठी पशुपालकांना लांब पल्ल्याची वाहतूक करून आणावी लागत आहे.

एल.डी. वाघमोडे 

उन्हाळ्यास सुरुवात झाली तसे चाराटंचाई जाणवू लागली आहे. यंदा ज्वारीचे उत्पादन कमी असल्याने कडब्याचे दर शेकडा तीन ते चार हजारांवर पोहचले आहेत. शिवाय ओल्या चाऱ्याची अशीच अवस्था आहे. ओल्या-वाळलेल्या चाऱ्यासाठी पशुपालकांना लांब पल्ल्याची वाहतूक करून आणावी लागत आहे.

यामुळे पशुपालक मेटाकुटीला आला आहे. ग्रामीण अर्थकारणाचा आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्यक असणारा चारा साठवणुकीसाठी प्रचलित असलेल्या मुरघास पद्धतीमुळे कागदोपत्री तुटवडा नसला, तरी प्रत्यक्षात मात्र चाऱ्याच्या किमती वेगाने वाढताना दिसत आहेत.

असे आहे चाऱ्याचे दरपत्रक

ज्वारीचे प्रमाण घटल्याने कडबा उपलब्ध नाही. आजूबाजूच्या जिल्ह्यातून तीन ते चार हजार रुपये शेकडा, बाहेरच्या जिल्ह्यातून येणारा तूर, सोयाबीन, हरभरा भुसा २० ते २५ हजार रु. प्रति टन, ओला चारा प्रति गुंठा ऊस ५ हजार, कडवळ २ हजार, मका दोन ते अडीच हजार रुपये यांसाठी लागणारी वाहतूक पशुपालकांना करावी लागत आहे.

२ हजार हेक्टरवर चाऱ्याची नोंद

सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुका कृषी विभागाकडे रब्बी मका १ हजार १४५ हेक्टर, कडवळ ७५१ हेक्टर, लसूण घास ६६ हेक्टर, नेपीअर ग्रास ५९ हेक्टर, एकूण रब्बी चारा २ हजार २१ हेक्टर नोंद झाली आहे.

मुरघास पद्धतीवर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा भर

• साहजिकच यामुळे चाऱ्यासाठी लांब पल्ल्याची वाहतूक पशुपालकांना करावी लागत असून, चढ्या दाराचा सामना करावा लागत आहे.

• माळशिरस तालुक्यात दुग्धोत्पादन व शेळीपालनासाठी वाळलेला चारा म्हणून कडबा, तूर, सोयाबीन, हरभऱ्याची कुट्टी, तर ऊस, कडवळ व वेगवेगळ्या प्रकारचे घास यांचा ओला चारा म्हणून वापर होतो.

• सध्या प्रचलित असलेल्या मुरघास पद्धतीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भर दिला असल्याने सर्रास शेतकरी दररोज शेकडो टन मुरघास साठवणूक करत आहेत. साहजिकच यामुळे चाऱ्याचे दर दिवसेंदिवस तेजी घेताना दिसत आहेत.

हेही वाचा : पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड; विक्रमी उत्पादन घेत फायद्याची शेती करणारे सुधारकराव

English
हिंदी सारांश
Web Title : Sorghum Production Decline Causes Fodder Prices to Surge; Cattle Owners Struggle

Web Summary : Reduced sorghum yield has skyrocketed fodder prices, leaving cattle owners struggling. High costs and long-distance transport burden farmers. While modern silage methods exist, fodder prices continue to rise sharply, impacting rural economies.
टॅग्स :दुग्धव्यवसायशेतीशेतकरीशेती क्षेत्रसोलापूरदूधगाय