Join us

Dudh Dar Vadh : राज्यातील या दूध संघाने दूध खरेदी दरात महिन्याभरात केली तीन वेळा वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:07 IST

दूध संघाने खरेदी दरात महिन्याभरात तीन वेळा वाढ केल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादितच्या वतीने सोमवार (दि. १) सप्टेंबरपासून दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता दूधउत्पादकांना उच्चांकी दर मिळणार आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन संजय रामचंद्र कोकरे यांनी दिली.

चेअरमन कोकरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, दूध संघाच्या एकूण २६५ प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिदिन दूधसंकलन २.२५ लाख लिटर आहे. संघाचे कामकाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दूध संघाने खरेदी दरात महिन्याभरात तीन वेळा वाढ केली असून, १ सप्टेंबरपासून गाय दूध खरेदी दर फॅट/एस. एन. एफ ३.५/८.५ गुणप्रतकरीता प्रतिलिटर ३५ करण्यात आला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामती दूध संघामार्फत सर्व प्राथमिक दूध संस्थांना दूध तपासणीसाठी अनुदानावर मिल्क अ‍ॅनलायझर, इले. वजनकाटे व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात येतो.

दूध उत्पादकांना चाफकटर, मिल्किंग मशिन, मुरघास बॅग व मका बियाणे इत्यादीची अनुदानावर विक्री केली जाते.

संघाचे पाऊच पॅकिंग दूध व श्रीखंड, आम्रखंड, पनीर, दही, ताक, लस्सी, तूप, बासुंदी, पेढा, कलाकंद, खवा इत्यादी उत्पादन दुग्धपदर्थाचे असून, सदर पॅकिंग दूध व दुग्धजन्य पदार्थ 'नंदन' ब्रांड विविध शहरांमध्ये विक्री होत आहे.

हे नंदन पॅकिंग दूध पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, शिर्डी, मालेगाव, लोणावळा, मुंबई, वाशी, रोहा, महाड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या विविध शहरांमध्ये विक्री होत आहे.

पुणे व मुंबई येथील नामांकित हॉटेल, कार्पोरेट ऑफिस, नामांकित कंपन्या, हॉस्पिटल आदी ठिकाणी नंदन पाऊच पॅकिंग दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे.

संघाचे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य व वाजवी किमतीत बी. ओ. पी. बॅगमध्ये नंदन सुप्रीम, नंदन गोल्ड, नंदन गोल्ड प्लस, तसेच नंदन मिल्कमीन, नंदन समृद्धी आदी उत्पादने विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असल्याचे चेअरमन कोकरे यांनी सांगितले.

अधिक वाचा: अखेर नमोच्या हप्त्याचा जीआर आला; येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायगायशेतकरीशेतीबारामतीपुणे