Join us

Dudh Dar : गोकुळ व वारणाच्या गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 10:29 IST

'गोकुळ', 'वारणा', 'राजारामबापू' या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे.

कोल्हापूर : 'गोकुळ', 'वारणा', 'राजारामबापू' या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे.

३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ.चे दूध ३० रुपये लिटरने खरेदी केले जाणार असून, गुरुवार (दि. २१) पासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय खासगी व सहकारी दूध संघ संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

त्याबद्दल दूध उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजीची भावना व्यक्त होत आहे. गाय दूध पावडर, लोणी, दुधाचे बाजारातील विक्रीचे दर आणि खरेदी दर यामध्ये तफावत राहत आहे.

राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ पासून गाय दूध खरेदीचा ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. करिता किमान प्रतिलिटर २८ रुपये निश्चित केला आहे. महाराष्ट्रात इतर संघ २७ ते २८ रुपये दराने गाय दूध खरेदी करीत आहेत.

परंतु, फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघ ३३ रुपये अधिक अंतिम दूध दर फरक असा जवळपास गाय दूध खरेदी दर सहा रुपये जास्त आहे. त्यामुळे लोणी, दूध भुकटी याची उत्पादन किंमत जास्त येत असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही.

त्याचबरोबर गाय व म्हैस दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. येथून पुढेदेखील गाय दुधाची उपलब्धता चांगली असेल, परंतु दूध पावडर व लोण्याच्या विक्री किमतीत कोणतीही वाढ दिसून येत नसल्याने खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय दूध संघांनी घेतला आहे.

याबाबत, गुरुवारी (दि. २१) झालेल्या बैठकीस राजारामबापू दूध संघ, गोकुळ, वारणा, भारत डेअरीसह दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गुलालाच्या आधीच शेतकऱ्यांना झटकाविधानसभेचे मतदान झाल्यानंतर तातडीने दूध संघांनी हा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना झटका दिला. किमान गुलालापर्यंत तरी खूश ठेवायला हवे होते, अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा: Livestock Care in Winter : थंडीत जनावरांच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायदूध पुरवठागोकुळकोल्हापूरशेतीशेतकरी