सोलापूर : दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. मात्र, यातही काही दूध संस्थांनी हात मारल्याचा संशय आहे.
सोलापूर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील २५८ दूध संस्थांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांसह १९२ कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दुग्ध विकास आयुक्तांनी दिले आहेत.
तीन जिल्ह्यांतील ८० कोटी ६८ लाख रुपये इतके अनुदान देण्याबाबत तपासणी अहवालावर निर्णय अवलंबून आहे. दूध दरात घसरण झाल्याने मागील वर्षी अनुदान देण्याचा विषय पुढे आला.
११ जानेवारी २०२४ पासून प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात आले. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर तेही थेट अनुदान जमा करण्यास सुरुवातीला दूध संस्थांनी विरोध केला.
दुभत्या गायींना टॅगिंग करण्यात आल्याने बोगस जनावरे दाखविता येत नाहीत, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे पाच रुपये अनुदानासाठी सुरुवातीला फारच कमी दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते.
टॅगिंगशिवाय अनुदान फाइल घेतली जात नसल्याने दुसऱ्या टप्प्यात काही संस्थांनी तर सात रुपये अनुदानासाठी आणखीन दूध संस्थांची भर पडली.
अपेक्षेपेक्षा अधिक दूध संकलनाच्या फाइल अनुदानासाठी दाखल झाल्याने दुग्ध विकास आयुक्त कार्यालयाच्या ही बाब लक्षात आली. संशय वाटलेल्या काही दूध संस्थांच्या अनुदान फाइल तपासण्यात आल्या.
त्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची नावे, बँकांतील तपशील व प्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या तपशिलात तफावत आढळून आली. अनुदान वितरित करणारी यंत्रणा शासन असल्याने शासनानेच प्रस्ताव तपासणीचे आदेश दिले.
वीस हजार लिटर संकलन असलेल्या संस्थांची तपासणी१) अहिल्यानगर जिल्ह्यातील १२७, पुणे जिल्ह्यातील ६२ व सोलापूर जिल्ह्यातील ६९ दूध संस्थांची तपासणी पथकामार्फत सुरू आहे. प्रति दिन २० हजार लिटरपर्यंत दूध संकलन असलेल्या २५८ दूध संस्थांची तपासणी होणार आहे.२) अहिल्यानगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील दूध संस्थांची पथकातील अधिकारी ग्राउंडला जाऊन तपासणी करणार आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर जी परिस्थिती असेल त्यावर थांबविलेले अनुदान वितरित करणे अवलंबून असल्याचे सांगण्यात आले.
ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात दूध घातले आहे त्यांचे अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, काहींनी बनवाबनवी केली आहे. तपासणी ११ जानेवारीपासून दिलेल्या अनुदानाची होणार आहे. सत्य समोर आल्यानंतर प्रत्यक्षात दूध उत्पादकांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. - वरिष्ठ अधिकारी
अधिक वाचा: जनावरांच्या पोटात जंत झाले आहेत हे कसे ओळखाल? काय कराल उपाय? वाचा सविस्तर