सोलापूरप्रमाणेच पुणे व अहिल्यानगरच्यादूध संस्थांनीही दूध अनुदानात गडबड केली असून, या संस्थांनाही दप्तराच्या फेरपडताळणीला बोलावण्यात आले आहे. या तीन जिल्ह्यांतील ७८ दूध संस्थांचे दूध संकलन संशयात आहे.
दूध खरेदी दर घसरल्याने शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाने दूध संकलनावर अनुदान जाहीर केले होते. ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ या कालावधीत राज्यात अवघ्या २३४ दूध संस्थांना पाच रुपयांनी अनुदान दिले होते.
या कालावधीत मोजक्याच संस्थांनी अनुदान योजनेत भाग घेतला. मात्र, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अनुदानासाठी तब्बल ७३१ दूध संस्थांनी प्रस्ताव दाखल केले.
त्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत प्रतिलिटर सात रुपये अनुदानासाठी ६५८ दूध संस्थांचे प्रस्ताव आले. अनुदानासाठी दाखल झालेल्या काही संस्थांच्या दूध संकलन व त्यांचे पेमेंट याच्या आकडेवारीवात तफावत आढळून आली.
त्यामुळे दुग्ध विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी तपासणीसाठी सोलापूर, पुणे व अहिल्यानगर या जिल्ह्यात पथक नियुक्त केली होती.
या पथकाकडून तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यातील ७८ दूध संस्थांना दप्तराच्या फेरतपासणी करण्यासाठी बोलावले आहे.
...तर अनुदानाला ब्रेक लागणार◼️ फेरपडताळणीसाठी सोलापूरच्या सर्वाधिक २९ दूध संस्था, पुण्याच्या २७, तर अहिल्यानगर २२ दूध संस्था आहेत.◼️ १६ जुलै रोजी सोलापूर, १७ जुलै रोजी अहिल्यानगर, तर १८ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील दूध संस्थांना दप्तर घेऊन मुंबईला बोलावले आहे.◼️ या संस्थांचे अनुदान देण्याबाबत तपासणीनंतर निर्णय होणार आहे.◼️ फेरपडताळणीत गडबड असल्याचे स्पष्ट झाल्यास या संस्थांना अनुदान तर मिळणार नाहीच उलट कारवाई होणार असल्याचे दुग्ध विकास आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
अधिक वाचा: पशुपालकांना मिळणार आता शेतीप्रमाणे कर्ज आणि विमा; 'या' व्यवसायांचा समावेश? वाचा सविस्तर