Join us

लाल कंधारी, देवणी या देशी गायींच्या संवर्धनासाठी ८१ हेक्टरवर प्रक्षेत्र उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 10:21 AM

अंबेजोगाई तालुक्यातील मौजेसाकुड येथे पशुसंवर्धन विभागाची ८१ हेक्टर जमीन प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

लाल कंधारी व देवणी गोवंश प्रजातीचे जतन व संवर्धनाकरिता अंबेजोगाई तालुक्यातील मौजेसाकुड येथे पशुसंवर्धन विभागाची ८१ हेक्टर जमीन प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

लालकंधारी व देवणी या देशी गोवंशाचे मूळ पैदास क्षेत्र मराठवाड्यात असून, सदर गोवंशाचे अस्तित्व मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यात आहे. या स्थानिक जातींचे वैशिष्ट्ये म्हणजे सदर जाती या दूध उत्पादन व नर पशुधन शेतीकामासाठी उपयुक्त आहेत, मात्र २०१३ मध्ये लाल कंधारी गायींची संख्या १,२६,६०९ इतकी होती ती २०२० मध्ये १,२३,९४३ इतकी कमी झाली आहे. तसेच २०१३ मध्ये देवणी गायींची संख्या ४,५६,७६८ वरुन सन २०२० मध्ये १,४९,१५९ इतकी कमी झाली आहे. सदर प्रजातींचे महत्व विचारात घेऊन सदर जातींचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

साकुड पशुपैदास प्रक्षेत्रासाठी १३ नियमित पदे व ३७ इतकी पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येतील. पशुधनासाठी चारा, पशुखाद्य, औषधी तसेच विज, पाणी यासाठी दरवर्षी ६ कोटी इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :गायदुग्धव्यवसायदूधमराठवाडाअंबाजोगाईबीडमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे