संतोष मगर
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी, जनावरांची वंश सुधारणा व्हावी, दुग्ध सक्षम गायी-म्हशींची संख्या वाढावी यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून गायी-म्हशींचे कृत्रिम रेतन केले जात आहे.
वंशसुधार कार्यक्रमांतर्गत २०२४-२५ या अर्थिक वर्षात १६,४०५ गायींना कृत्रिम रेतन करण्यात आले. चालू वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत १४,६३७ गायींना कृत्रिम रेतन करण्यात आले.
परभणी जिल्ह्याची दुग्धक्षमता आणि जनावरांची वंश सुधारणा करण्यासाठी पशुसंवर्धन विभागांतर्गत ८६ पशुवैद्यकीय दवाखाने प्रयत्न करीत आहेत. शासनाने पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा दिल्याने राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला.
या पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तसेच जनावरांची वंश सुधारणा व्हावी, यासाठी कृत्रिम रेतन मोहीम राबविली जात आहे.
फेब्रुवारी अखेरपर्यंत १४,६३७ गायींना कृत्रिम रेतन देण्यात आले. तसेच ८,१७१ म्हशींना कृत्रिम रेतन करण्यात आले आहे. गतवर्षीची स्थिती पाहता यावर्षी संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा विश्वास पशूसंवर्धन अधिकारी के.डी. सांगळे, पशूधन विकास अधिकारी श्रीनिवास कराळे यांनी व्यक्त केला आहे.
८६ पशुवैद्यकीय संस्था, १३० सेवादात्यांचे जाळे
परभणी जिल्ह्यातील ८६ पशुवैद्यकीय संस्थांमार्फत नियमित कृत्रिम रेतन सेवा दिली जात आहे. ग्रामीण भागात ही सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सुमारे १२० ते १३० सेवादाते सुविधा देत आहेत. स्वयंसेवी क्षेत्रातील संस्थादेखील जिल्ह्यात सक्रिय असून वंशसुधार कार्यक्रमात योगदान देत आहे.
कृत्रिम रेतन कशासाठी?
• कृत्रिम रेतन ही पाळीव प्राण्यांसाठी, बहुत करून दुधाळू जनावरांच्या, कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरण्यात येणारी एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये वळूचे अथवा रेड्याचे रेतन संकलन करून ते योग्य प्रक्रिया करून साठविले जाते.
• नंतर त्याद्वारे गाय, म्हैस, अशाप्रकारच्या दुधाळू जनावरांचे 'फलन' केल्या जाते. या रितीच्या वापरण्याने, चांगल्या दर्जाची पशू संतती निर्माण होते. पशुपालनात आणि पशुंवर आधारित व्यवसाय करणाऱ्यांना ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते.
मादी वासरांची शक्यता ९० टक्के
'सेक्स शॉर्टेड सीमन' तंत्रज्ञानामुळे मादी वासरांची शक्यता २० टक्केपर्यंत वाढली आहे. ज्यामुळे दुग्धक्षमता सुधारते, अनुत्पादक नर कमी होतात आणि ग्रामीण दुग्धव्यवसायाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
परभणी जिल्ह्यातील जनावरांची संख्या
एकूण जनावरे - ३,०४,८९०
गोवंशीय जनावर - २,२३,३०८
म्हैस - ८१,५८२
