Join us

पशुसंवर्धन विभागात या पदासाठी मोठी भरती; २७९५ रिक्त पदे लवकरच भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:40 IST

pashusavardhan vibhag bharti पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

त्याअंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे.

सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण ४६८४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीत १८८६ पदे भरलेली असून २७९८ पदे रिक्त आहेत.

तसेच ३१ डिसेंबर २०२५ अखेर ८ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत, अशी एकूण २८०६ पदे रिक्त होणार आहेत. ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता.

या गोष्टीची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी पाठपुरावा करून पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला.

यापैकी सरळसेवा जाहिरात क्र. १२/२०२२ मधील प्रतिक्षायादीतील ११ पदे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित २७९५ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कळविण्यात आले आहे.

ही रिक्त पदे भरल्यानंतर विभागाचे कामकाज अधिक वेगाने होऊन ग्रामीण भागातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांना चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

अधिक वाचा: Pashu Ganana 2024 : येत्या महिनाभरात राज्यातील सर्व जनावरांची अचूक संख्या कळणार

टॅग्स :राज्य सरकारसरकारपंकजा मुंडेदुग्धव्यवसायगायनोकरीमहाराष्ट्रएमपीएससी परीक्षा