Join us

पुढील दोन महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर चारा विक्री व वाहतुकीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 09:43 IST

खरीप व रब्बी हंगामातील पेरणीमध्ये उत्पादित झालेल्या चाऱ्यानुसार पुढील अडीच महिन्यात शेवगाव, पाथर्डी व जामखेड या तालुक्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर : जिल्ह्यात खरीपरब्बी हंगामातील पेरणीमध्ये उत्पादित झालेल्या चाऱ्यानुसार पुढील अडीच महिन्यात शेवगाव, पाथर्डी व जामखेड या तालुक्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहणार आहे.

जिल्ह्यात लहान जनावरे २ लाख ७६ हजार ११५ व मोठी जनावरे १३ लाख २३ हजार ५४३ आहेत. तसेच १४ लाख ७९ हजार ८०३ शेळ्या व मेंढ्या आहेत.

एकूण जनावरांची संख्या ३० लाख ७९ हजार ४६१ आहे. टंचाई निकषानुसार या जनावरांना दरमहा ७लाख ९० हजार ९०२ मेट्रिक टन चारा लागतो.

खरीपरब्बी हंगामातील पेरणीनुसार अनुक्रमे ७५ लाख १२ हजार ९१७ व ६४ लाख ९२ हजार २८१ मेट्रिक टन अंदाजित चारा उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा विचार करता चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.

परंतु शेवगाव, पाथर्डी व जामखेड तालुक्यात अडीच महिन्यांपेक्षा जास्त दिवस पुरेसा चारा नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उत्पादित झालेल्या हिरवा व कोरडा चारा, मुरघास व टोटल मिक्स रेशन (टीएमआर) जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यात बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन व जिल्हा कृषी कार्यालयाकडून जिल्ह्यातील जनावरांची व चाऱ्याचा आढावा घेऊन जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या चाऱ्यावर इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यात बंदी घातली.

शिवाय जिल्ह्याबाहेरील निविदाधारकांना लिलाव देण्यास मनाई घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पुढील दोन महिने चारा बंदी लागू करण्यात आली आहे.

अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायगायअहिल्यानगरजिल्हाधिकारीशेतकरीखरीपरब्बीरब्बी हंगामपीक