Join us

पशुसंवर्धन राबविणार दुग्धविकासाची मोहीम; लिंग विनिश्चित वीर्यमात्रेचा होणार कृत्रिम रेतनात वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 10:10 IST

Sex Sorted Semen : नर अथवा मादी वासरे जन्माला घालण्यासाठी कृत्रिम रेतनाची (सिमेन्स) प्रक्रिया करण्यात येते. या माध्यमातून नर वासरे जन्माला आल्यास दुधाचे किंवा अन्य कुठलेही उत्पादन न होता, केवळ जनावरांच्या संगोपनावर आर्थिक खर्च करावा लागतो. यावर आता पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लिंग विनिश्चित वीर्यमात्रेचा वापर करून कृत्रिम रेतन केले जाणार आहे.

नर अथवा मादी वासरे जन्माला घालण्यासाठी कृत्रिम रेतनाची (सिमेन्स) प्रक्रिया करण्यात येते. या माध्यमातून नर वासरे जन्माला आल्यास दुधाचे किंवा अन्य कुठलेही उत्पादन न होता, शेतकऱ्यांना केवळ जनावरांच्या संगोपनावर आर्थिक खर्च करावा लागतो. यावर उपाय म्हणून आता पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांना लिंग विनिश्चित वीर्यमात्रेचा वापर करून कृत्रिम रेतन केले जाणार आहे. या माध्यमातून ९० टक्के मादी वासरे जन्माला येणार आहेत.

यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना अल्प दरात रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेमुळे पशुपालकांना आर्थिक लाभ होणार आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांचा दूध व्यवसायाकडे कल अहे. यासाठी शेतकऱ्यांच्या दारात गायी, म्हशी उभ्या असल्याचे चित्र दिसते.

या जनावरांवर हजारो रूपये खर्च केल्यानंतर आणि किमान ६ तास काम केल्यावर शेतकऱ्यांना काही प्रमाणात पैसे शिल्लक राहतात. एखाद्या गायीला वासरे जन्माला घालण्यासाठी कृत्रिम रेतन करण्यात येते. त्या माध्यमातून सरासरी नर वासरे ५० टक्के व मादी वासरे ५० टक्के जन्माला येण्याचे प्रमाण आहे.

नर वासरे जन्माला आल्यास त्यांचा सांभाळ करताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येते. त्यांच्यापासून शेतकऱ्यांना दूध उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून अनेकदा खोंडाचे संगोपन होत नाही. हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. यावर उपाय म्हणून मादी वासरे जन्माला येण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने लिंग विनिश्चित वीर्यमात्रा योजना आणली आहे. या योजनेमुळे पशुपालकांना आर्थिक लाभ होणार आहे.

जनावरांना लिंग विनिश्चित वीर्यमात्रेच्या माध्यमातून कृत्रिम रेतन देण्यासाठी जनावरांचे खासगी डॉक्टर दीड ते दोन हजार रुपये घेतात. मात्र आता सरकारी दवाखान्यात केवळ १८० ते २०० रुपयांमध्ये कृत्रिम रेतन दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांपेक्षा सरकारी पशुसंवर्धन विभागाकडे जनावरांच्या कृत्रिम रेतनाची मागणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे होणार फायदे

नववासरांचा संगोपन खर्च वाचणार जातिवंत मादी वासरे जन्माला येणार असल्याने दूध उत्पादन वाढून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे; यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक खर्चात बचत होणार आहे.

नावीन्यपूर्ण योजनेतून पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत जनावरांना कृत्रिम रेतन दिले जाणार आहे. या योजनेसाठी शासनाने निधी मंजूर केला असून, या माध्यमातून विनिश्चित वीर्यमात्रा खरेदी करून जनावरांना दिल्या जाणार आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत कृत्रिम रेतन हे अल्प दरात उपलब्ध होणार आहे. - डॉ. पुरुषोत्तम सोळंके जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि. अमरावती.

हेही वाचा : रेबिज बाधित जनावरांचे दूध सेवन केल्यास रेबिज होतो का? वाचा काय सांगताहेत तज्ञ

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधशेतीशेतकरीशेती क्षेत्रसरकारअमरावतीविदर्भ