पशुपालकांना भेडसावणाऱ्या कृषी वीज दराच्या तुलनेत जास्त वीज दर, सोलर एनर्जीसाठी अनुदानाचा अभाव, ग्रामपंचायत कर, शेती कर्जाच्या व्याज दराच्या तुलनेत अधिक व्याज दराची आकारणी या अडचणींचे निराकरण झाल्यास पशुपालन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढून पशुजन्य उत्पादनात वाढ होईल.
व्यावसायिक नफ्यात वाढ तसेच स्पर्धात्मक वातावरण यामुळे पशुजन्य उत्पादित बाबींस मुल्यवर्धन साखळीची निर्मिती, शेती प्रमाणे गट पध्दतीने पशुसंवर्धन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब यासारख्या बाबीमध्ये आपोआप वाढ होईल.
पशुपालकांना खालीलप्रमाणे लाभ मिळणार
◼️ पशुसंवर्धन विषयक व्यवसायासाठी वीज दर आकारणी "कृषी इतर" या वर्गवारीनुसार न करता कृषी वर्गवारीप्रमाणे वीज आकारणी करण्यात येईल.
◼️ कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व इतर सोलार संच उभारण्यास कृषी व्यवसायास देण्यात येणाऱ्या दराने अनुदान/सवलत देण्यात येईल.
◼️ पशुपालन व्यवसायास स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून कृषी व्यवसायास ज्या दराने ग्रामपंचायत कर आकारणी केली जाते त्याच दराने व राज्यभरात समान दराने ग्रामपंचायत कर आकारणी करण्यात येईल.
◼️ कृषी प्रमाणे पशुपालन व्यवसायास कर्जावरील व्याज दरात सवलत देण्यात येईल.
वीजदरात सवलतीचा लाभ घेण्यासाठी अटी
१) पशुधन संख्या
◼️ २५,००० किंवा त्यापेक्षा कमी मांसल कुक्कुट पक्षी/५०,००० किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी.
◼️ ४५,००० किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या हॅचरी युनिट.
◼️ १०० किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा.
◼️ ५०० किंवा त्यापेक्षा कमी मेंढी/शेळी गोठा.
◼️ २०० किंवा त्यापेक्षा कमी वराह.
२) वीजदरात सवलतीचा लाभ मिळण्याकरिता पशुपालन प्रकल्पांनी संबंधित जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
३) पशुपालन प्रकल्पांमधील सर्व पशुधनाची एनडीएलएम (भारत पशुधन) पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.
४) पशुपालन प्रकल्पाकरिता स्वतंत्र वीज मीटर असणे आवश्यक आहे.
५) पशुपालन प्रकल्पातील पशुगृह, चारा/पशुखाद्य, पाण्याचे पंप, प्रक्रिया व शितसाखळी राखण्याकरिता आवश्यक यंत्रसामुग्रीकरिता सवलतीच्या दरातील वीजवापर करता येईल.
६) अवसायनातील सहकारी संस्था/बंद पडलेले पशुपालन प्रकल्प वीजदर सवलतीस पात्र ठरणार नाहीत.
वीजदर सवलत लागू करण्यासाठी कार्यपध्दती
- "कृषि समकक्ष दर्जा" च्या अनुषंगाने सध्या कार्यरत असलेल्या/अस्तित्वात असलेल्या वीजदर सवलतीस पात्र लाभार्थ्यांचा आवश्यक तो तपशील संबंधित तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी यांनी संबंधित उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी-महावितरण (MSEDCL) यांना उपलब्ध करुन द्यावा
- नवीन पशुपालक लाभार्थ्यांनी वीज मीटर जोडणीसाठी संबंधित, उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी-महावितरण (MSEDCL) यांच्याकडे ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने विहित स्वरुपात अर्ज सादर करावा. सादर केलेल्या अर्जाची प्रत सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय), तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय यांना देण्यात यावी.
- सदर योजनेच्या निकषाप्रमाणे तसेच, त्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलास अनुसरुन आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणे लाभार्थ्यांस बंधनकारक असेल.
- वीजदर सवलती संदर्भातील येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) व अतिरिक्त कार्यकारी अभियंता/उप कार्यकारी अभियंता उप विभाग महावितरण हे तालुका स्तरावर तसेच संबंधित जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) कार्यालय व कार्यकारी अभियंता (प्रशासन) मंडल कार्यालय महावितरण हे जिल्हास्तरावर समन्वयाचे काम पाहतील.
- महावितरण कंपनीने पात्र लाभार्थ्यास वीजदरात सवलत देण्यासाठी आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी व त्याचा स्वतंत्र तपशील ठेवावा. सर्व जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांची माहिती व त्यासाठी लागणारा निधी याची माहिती एकत्रितपणे संकलित करून आयुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय) कार्यालय पुणे यांच्याकडून मुख्य अभियंता (वाणिज्य) मुख्य कार्यालय, मुंबई यांना पाठविण्यात यावी. त्यानंतर मुख्य अभियंता (वाणिज्य) महावितरण कार्यालयाकडून अग्रीम निधीची मागणी ऊर्जा विभागास करण्यात येईल.
- सदर योजनेत वीज ग्राहकांचा अनाधिकृत वीजवापर आढळल्यास विद्युत अधिनियम, २००३ कलम १२६ व कलम १३५ च्या अनुषंगाने प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी महावितरण (MSEDCL) कंपनीची राहील.
- विद्युत अधिनियम, २००३ मधील कलम ६५ अनुसार वीजदरात सवलत द्यावयाची झाल्यास त्याची भरपाई वीज वितरण कंपनीस आगाऊ अर्थसहाय्याच्या स्वरुपात करणे आवश्यक आहे. त्यामुळे उपरोक्त योजनेतंर्गत वीजदरात सवलत देण्यासाठी होणारा अंदाजित खर्च निश्चित करुन महावितरण कंपनीने अगोदरच्या तिमाहीत अग्रीम अर्थसहाय्याची मागणी ऊर्जा विभागाकडे करावी. सदरची मागणी तपासून अर्थसहाय्याच्या निधीवाटपाचे आदेश ऊर्जा विभागाकडून काढण्यात येतील.
- सदर योजनेत देण्यात येणाऱ्या वीजदर सवलतीची प्रतिपुर्ती महावितरण कंपनीस करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्याची व सदर उद्देशासाठी आवश्यक तो निधी अर्थसंकल्पित करण्याची कार्यवाही ऊर्जा विभागाने करावी.
अधिक वाचा: साखर कारखानदारांचे पहिल्या उचलीचे आकडे येण्यास सुरवात; फायनल किती रुपयांपर्यंत दर देणार?
