ब्रुसेलोसिस हा एक जीवाणूजन्य (Bacterial) संसर्ग आहे जो Brucella या जीवाणूंमुळे मानवांमध्ये होतो. हे जीवाणू सामान्यतः प्राण्यांमध्ये आढळतात. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर आणि काही वेळा कुत्र्यांमध्ये देखील याचा प्रसार होतो. या प्राण्यांच्या शरीरात हे जीवाणू अनेक महिने किंवा वर्षभर राहू शकतात आणि ते त्यांचे दूध, लाळ, मूत्र, विष्ठा, गर्भाशयातील स्त्राव किंवा गर्भपातानंतरच्या उरलेल्या अवयवांद्वारे बाहेर पडतात.
मानवामध्ये हा आजार संक्रमित प्राण्यांच्या थेट संपर्काने किंवा त्यांच्याद्वारे मिळालेल्या दूषित उत्पादनांद्वारे होतो. विशेषतः न शिजवलेले किंवा अपुरे शिजवलेले दूध, लोणी, पनीर, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा वापर तसेच प्राण्यांच्या स्राव किंवा ऊतींच्या थेट संपर्कातून हे संक्रमण होऊ शकते.
ग्रामीण भागात विशेषतः जिथे पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि शेतीवर आधारित जीवनशैली आहे तिथे ब्रुसेलोसिसचा धोका अधिक असतो. शेतकरी, पशुवैद्यक, दूध व्यवसायाशी संबंधित कामगार आणि मांस प्रक्रिया उद्योगात काम करणारे लोक हे विशेषतः धोकीच्या गटात येतात.
ब्रुसेलोसिसची संसर्गजन्य क्षमता मानवांमध्ये फारशी जास्त नसली तरी तो संसर्ग झाल्यास शरीराच्या विविध अवयवांवर खोलवर परिणाम करू शकतो. यामुळे दीर्घकालीन त्रास होऊ शकतो, विशेषतः वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास. या आजाराची लक्षणे अनेकदा सामान्य व्हायरल इन्फेक्शनसारखी दिसत असल्याने योग्य निदान न झाल्यामुळे उपचारात विलंब होतो परिणामी आजार दीर्घकाळ टिकतो.
या रोगाची सर्वाधिक धोकादायक बाब म्हणजे त्याची दीर्घकालीन लक्षणे आणि गुंतागुंत निर्माण करण्याची क्षमता. काही रुग्णांमध्ये ब्रुसेलोसिसमुळे फुप्फुस, हृदयाचे आवरण (Endocardium), यकृत, आणि अगदी मज्जासंस्था (Central Nervous System) यावरही परिणाम होऊ शकतो.
मध्यमतेकडून गंभीरतेकडे जाणारा संसर्ग
ब्रुसेलोसिस सुरुवातीला सौम्य ताप किंवा अशक्तपणासारख्या लक्षणांनी सुरू होतो. परंतु वेळेवर निदान व उपचार न झाल्यास तो शरीरातील विविध अवयवांवर विशेषतः फुप्फुस, हृदय व मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतो. या संसर्गामुळे दीर्घकालीन लक्षणेदेखील उद्भवू शकतात. अनेक वेळा रुग्ण दीर्घकाळ थकवा, सांधेदुखी व तापाने त्रस्त राहतो.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको
ब्रुसेलोसिस असलेल्या रुग्णांना वारंवार येणारा ताप, भूक मंदावणे, मांसपेशींच्या व सांध्यांच्या वेदना, मळमळ, उलटी व थकवा अशी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांमुळे सामान्य ताप अथवा व्हायरल इन्फेक्शन समजून उपचारात विलंब होतो.
उपचार शक्य, पण वेळेवर निदान गरजेचे
या आजाराबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. मात्र पुणे जिल्ह्यातील दौंड येथील डॉ. डी. एस. लोणकर यांच्या मते योग्य निदान झाल्यास सुमारे ४५ दिवसांच्या औषधोपचार व विश्रांतीमुळे हा आजार पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे आजाराची लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा : भेसळयुक्त दूध ओळखा घरच्या घरी; 'या' घरगुती चाचण्या करतील दूध भेसळीचा पर्दाफाश