Dairy Animals : दावणीला बांधलेल्या गायींच्या आरोग्य, आहार अन् विहाराचे 'मॉनिटरिंग' करणारा 'बेल्ट' गायींच्या गळ्यात बांधून मालक आता आपल्या दुधाळ जनावरांचे 'हायटेक' संगोपन करणार आहेत.
'बायफ'ने कळंब तालुक्यातील देवळाली येथे प्रायोगिक तत्त्वावर दोन शेतकऱ्यांच्या गोठ्यात हा अभिनव पशुधन आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे.
ग्रामीण भागातील लोकजीवन सुकर व्हावे, यासाठी सातत्याने विविध कृतिशील कार्यक्रम राबविणाऱ्या 'बायफ'ने आता दुष्काळी व शेतकरी आत्महत्याग्रस्त असा भाळी शिक्का मारलेल्या धाराशिव जिल्ह्यात 'बायफ लाईव्हलीहूड' अंतर्गत बीएसएस मायक्रो फायनान्सच्या सामाजिक दायित्व निधीतून पशुधन विकास कार्यक्रम हाती घेतला आहे.
या माध्यमातून कळंब तालुक्यातील काही गावांत पशुधन विकासाला नवी दिशा देण्यास सुरुवात केली आहे. यातूनच १० गावांतील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यातील दावणीला सुदृढ गाय, म्हैस अशा दुधाळ पशूचा राबता असावा, यासाठी 'सॉर्टेट सीमेन' ची मात्रा पुरवण्याचा कार्यक्रमही राबविला जात आहे.
सकस चारा व मिनरल्स पुरविण्यात तसेच पशुपालन प्रशिक्षण यावर भर दिला जात आहे. आता पशुपालकांना गायींना 'ॲटोमेटिक मेडिकल काऊ बेल्ट' बसविण्यात येत असून, याद्वारे गायींच्या आरोग्यविषयक नोंदी घेतल्या जाणार आहेत. एकूणच बायफचा हा पशुधन विकास प्रकल्प दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना आधार ठरणार आहे.
गळ्यात बेल्ट, हातात रिपोर्ट कार्ड...
* बायफने बीएसएस मायक्रो फायनान्सच्या सामाजिक दायित्व निधीतून तालुक्यातील देवळाली येथील पांडुरंग खापरे, विठ्ठल खापरे यांच्या दहा गायींना 'ॲटोमेटिक मेडिकल काऊ बेल्ट' बसवला आहे.
* या बेल्टमधील कार्ड गायींच्या हालचालींवर, आरोग्यविषयक बाबींच्या नोंदी घेणार आहे. या बेल्टची मोबाईलमधील ॲपला कनेक्टिव्हिटी राहणार आहे.
* यामुळे गायींच्या आरोग्य, आहार, विहारविषयक बाबींचा अन्वेषक रिपोर्ट शेतकऱ्यांना विनासायास पाहता येणार आहे, असे बायफचे प्रकल्प अधिकारी अतुल मुळे यांनी सांगितले.
काय आहेत फायदे ?
* बेल्टमुळे गाईच्या आरोग्यविषयक माहिती पशुपालकांना होणार आहेत.
* यात योग्य कृत्रिम गर्भधान सुनिश्चित होवून प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होईल.
* लोकेशन टॅगिंग सुविधामुळे स्थानाची अचूक माहिती मिळणार आहे.
* गाईंच्या संगोपनात उपयोगी ठरणारा डेटा पशुपालकांना सहज उपलब्ध होणार आहे.
* पशुपालकांचे शाश्वत जीवनमान बळकट होण्यास मदत होणार
* दैनंदिन तापमान, माजावर आलेली गाय, आहार, हृदयगती ज्ञात होणार
* आजाराची लक्षणे, पोषण, रोग अन्वेषण, दूध उत्पादन यासाठी उपयोगी होईल.
आता हायटेक आरोग्य व्यवस्थापन प्रणाली...
* बायफने आता आपल्या पशुधन विकास कार्यक्रमांतर्गत पशुधनाच्या हायटेक आरोग्य व्यवस्थापन प्रणालीचा पशुपालक शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्याची भूमिका घेतली आहे.
* वैज्ञानिक दृष्टिकोनातून पशुपालन सक्षम करणे, हा यामागचा उद्देश आहे. याचा उपयोग करून पशुपालक गायींच्या आरोग्यावर, हालचालींवर सहज निरीक्षण व नियंत्रण ठेवणार असल्याचे बायफचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉ. संतोष एकशिंग यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.