महाराष्ट्राची शेतीची परंपरा पर्यटकांपर्यंत पोहोचवावी, यातून पर्यटकांची निसर्गाशी नाळ जोडली जावी, तसेच या क्षेत्रात तरुणांना रोजगाराची संधी मिळावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता दिली आहे.
ग्रामीण विकासातून राज्याचा विकास, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे प्रयत्न केले जात आहेत.
कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास साधणे आणि त्यातून राज्याचा सर्वांगीण विकास घडविणे तसेच शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या धोरणामागचा मुख्य उद्देश आहे.
शेतकरी आणि अशी पर्यटन केंद्र उभारणाऱ्या तरुणांना नोंदणी प्रमाणपत्रावर बँक कर्ज सुविधा, वीज व करांमध्ये सवलत, पर्यटन महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ, केंद्रासाठी खोल्यांची नियमावली शिथिल करून ४ ते ८ खोल्या परवानगीशिवाय वापरता येणार आहेत.
कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांनाही नवा व्यवसाय मिळणार असून, पर्यटकांना शेतातील नांगरणी, पेरणी, कापणी, आदींच्या प्रत्यक्ष अनुभवातून आनंद मिळणार आहे.
तसेच बैलगाडी, घोडागाडी सफर, ग्रामीण खेळ व लोककला कार्यक्रम, पारंपरिक महाराष्ट्रीय भोजनाची मेजवानी तसेच सेंद्रिय शेती, जलसंधारण, सौर व पवन ऊर्जा अनुभव याबरोबरच हस्तकला, आदिवासी कला व खाद्यसंस्कृती यांचा आनंद घेता येणार आहे.
पर्यटन गाईडिंग, हॉटेल मॅनेजमेंट व होमस्टे व्यवस्थापन, साहसी पर्यटन उपक्रम, फळ प्रक्रिया व लघुउद्योग, हस्तकला, लोककला व संस्कृती जपणारे प्रकल्प यामुळे तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होणार आहेत.
यातून तरुणांना रोजगार आणि पर्यटकांना निसर्गाचा अनोखा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे तरुणांचा शहराकडे वाढलेला ओढा कमी होण्यास मदत होईल.
पर्यटनाचा उद्देश
◼️ ग्रामीण विकास.
◼️ शेतमालाला थेट बाजारपेठ.
◼️ तरुण व महिलांना गावातच रोजगार.
◼️ लोककला व परंपरेचे संवर्धन.
◼️ विद्यार्थ्यांना शेती व कृषीपूरक.
◼️ व्यवसायाची माहिती.
◼️ पर्यटकांना प्रदूषणमुक्त, शांत व निसर्गसंपन्न अनुभव.
एमटीडीसीची पर्यटकांसाठी महाभ्रमण योजना
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाभ्रमण योजनेत पर्यटकांना निसर्ग व सह्याद्रीची सैर, ऐतिहासिक वारसा, लोककला, खाद्यसंस्कृती व पाककला, जंगले व पर्यावरण, फिल्म टूर व सिटी दूर, साहसी पर्यटन एकत्र करता येणार आहे.
अधिक वाचा: रेशन वाटपात गहू कोटा वाढविला तर तांदूळ घटविला; आता कुणाला मिळणार किती धान्य?
