नाशिक : राज्य सरकारकडून पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी व महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने 'आई' हे महिला केंद्रित पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महिलांना १५ लाखांपर्यतचे विनातारण अन् बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याची योजना आणली आहे. पर्यटनपूरक लहान-मोठे व्यवसाय चालविणाऱ्या महिलांना किंवा नवीन पर्यटनपूरक व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
४१ उद्योग पर्यटनाशी निगडित
पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या ४१ प्रकारच्या व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभागाकडून महिलांना 'आई' या योजनेंतर्गत कर्जपुरवठा केला जातो. हे कर्ज विनातारण व बिनव्याजी स्वरूपाचे असते.
अशा आहेत योजनेच्या अटी
- पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असायला हवा.
- पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालविलेला असावा.
- ५० टक्के व्यवस्थापकीय व अन्य कर्मचारी महिला असणे आवश्यक.
- पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात.
- कर्जाचे हप्ते वेळेत भरणे बंधनकारक.
- लाभार्थी, पर्यटन व्यवसाय व कर्ज देणारी बँक राज्यात स्थित असावी.
१५ लाखांपर्यंत महिलांना कर्ज
पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणीसाठी किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन व्यवसायाकरिता बँकेने १५ लाख रुपयांपर्यंतचे मयदित कर्ज मंजूर केले जाते. कर्जदार महिलेने वेळेत कर्जाचा हप्ता भरल्यास त्यावरील व्याजाची रक्कम (१२% च्या मर्यादित) कर्ज परतफेड किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रुपये ४.५० लाख मर्यादपर्यंत जे आधी घडेल तोपर्यंत व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालयाकडून केला जाईल.
कुठे, कसा करायचा अर्ज ?
या योजनेबाबत अर्ज करण्यासाठी maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा शासकीय विश्रामगृह आवारातील पर्यटन भवन येथे (०२५३-२९९५४६४) संपर्क साधावा. तसेच ddtourism.nashik-mh@gov.in या ई-मेल आयडीवर थेट अर्ज करू शकता.
शासनाची 'आई' ही योजना महिलांसाठी अधिक उपयुक्त आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. पर्यटनवाढीसाठी व महिलांना स्वावलंबी करणारी योजना पर्यटनाशी निगडित ४१ प्रकारच्या व्यवसायांसाठी अर्थसाहाय्य देते.
- नंदकुमार राऊत, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक
