दत्ता लोकरे
सरवडे : एखादा पदार्थ आपण खाल्ला की त्यासोबतचा स्ट्रॉ आपण तितक्याच सहजतेने टाकून देतो. मात्र, हाच स्ट्रॉ घेतलेल्या पदार्थासोबत खाता आला तर... होय.
वडकशिवाले (ता. करवीर) येथील संशोधक अभ्यासक तेजस्विनी धनाजी पाटील यांनी कागदाच्या स्ट्रॉला पर्याय म्हणून बाजरीपासून बनविलेले खाण्याचे स्ट्रॉ तयार केले आहेत.
भारतीय प्राद्यौगिकी संस्थान आयआयटी रुरकीमध्ये त्या पीएच.डी. करीत असून, प्रा. कीर्तिराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन केले.
कागदाच्या स्ट्रॉमध्ये पीएफएएस (पोलिफ्लुरो अल्किल सबस्टनसेस) किंवा कायमची रसायने (फॉरेव्हर केमिकल) असतात. जी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात.
कागदाच्या स्ट्रॉला जलप्रतिरोधी बनविण्यासाठी हे केमिकल वापरले जाते. याउलट बाजरी आधारित खाण्यायोग्य स्ट्रॉ उत्तम मानले जातात. हे बाजरीचे स्ट्रॉ नैसर्गिकरीत्या विघटन होण्याच्या दृष्टीने बनविलेले आहेत.
हे स्ट्रॉ पर्यावरणाची कोणतीही हानी न करता रसायनमुक्त टिकाऊ आणि ग्राहकांसाठी पूर्णपणे सुरक्षित पर्याय उपलब्ध करीत असल्याचे प्रा. कीर्तिराज गायकवाड यांनी सांगितले.
पोषणमूल्ये समाविष्ट असणारे उत्पादन
▪️कार्यक्षमतेच्या पलीकडे जाऊन काहीतरी करणे हा आमचा प्राथमिक उद्देश होता. सोबतच ते पर्यावरणपूरक, ग्राहक उपयोगी व शाश्वत असावे याकडे कल होता.
▪️पोषणमूल्यांचा समाविष्ट करणारे एक उत्पादन आम्ही तयार केले आहे. जे टिकाऊ, पौष्टिक व शाश्वत असल्याचे तेजस्विनी पाटील यांनी सांगितले.
▪️तेजस्विनी पाटील यांनी कऱ्हाडच्या मोकाशी कॉलेज येथून फूड टेक्नॉलॉजीमधून बी.टेक केले असून, काशी हिंदू विश्वविद्यालयात एम.टेक केले.
▪️त्यानंतर त्या आयआयटी रुरकी (उत्तराखंड) येथे फूड पॅकेजिंगमध्ये पीएच.डी. करीत आहेत.
▪️जिल्हा शेतकरी संघ शाखा बिद्रीचे शाखाधिकारी धनाजी पाटील यांच्या त्या कन्या आहेत.