रत्नागिरी: नाचणीतील आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे नाचणीसाठी वाढती मागणी आहे. जिल्ह्यात दुय्यम पीक म्हणून नाचणी लागवड केली जाते.
खरीप हंगामात सपाट, वरकस, डोंगर उताराच्या जमिनीत नाचणी लागवड करण्यात येते. शेतीसाठी मजुरांची कमरता भासते.
शिवाय नाचणी काढणीनंतर मळणी, सडणी प्रक्रिया कष्टदायक, वेळखाऊ आहे. त्यासाठी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने नाचणी मळणी, सडणीसाठी प्रभावी यंत्र विकसित केले आहे.
कशी केली जाते नाचणीची मळणी व सडणी?
◼️ नाचणी काढून आणल्यानंतर मळणी व सडणी ही कामे केली जातात.
◼️ काढून नाचणीची कणसे आणल्यानंतर ती काठीने झोडपली जातात.
◼️ त्यानंतर काडी, कचरा वेगळा केला जातो.
◼️ नाचणीच्या दाण्यावरील भूसा काढण्यासाठी मुसळाचा वापर करून सडले जाते.
◼️ नंतर वारा घालून भुसा बाजूला केला जातो, नंतर नाचणीचे दाणे मिळतात.
◼️ यासाठी भरपूर मनुष्यबळ वेळ, श्रम लागतात.
◼️ काठीने झोडपल्यामुळे अंगदुखी वाढते व सडताना धूळ तोंडात जात असल्याने आरोग्याच्या तक्रारी संभवतात.
◼️ मळणी व सडणीसाठी मनुष्यबळ सहज उपलब्ध होत नाही.
नाचणी मळणी व सडणी यंत्र
◼️ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नाचणी मळणी, सडणी यंत्र वापरण्यास सोपे आहे.
◼️ तसेच वाहतुकीसह सुलभ आहे.
◼️ हे विजेवर चालणारे स्वयंचलित यंत्र असून याद्वारे मळणी केल्यास खर्चात ७२ टक्के बचत होते.
◼️ या यंत्राला चाके व एक हॅण्डल सुद्धा आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते.
◼️ एखाद्या पालखीप्रमाणे खांद्यावरूनही ने-आण करता येते.
◼️ दोन अश्वशक्तीच्या सिंगल फेज विद्युत मोटार या यंत्राला बसविली आहे.
◼️ घरगुती सिंगल फेजच्या मीटरवर हे यंत्र चालते.
◼️ मळणीची कार्यक्षमता ९९ टक्के असून, धान्यफुटीचे प्रमाण ०.१ टक्के एवढेच आहे.
◼️ या यंत्रणाची मळणी/सडणीची क्षमता प्रती तास ३६ किलो इतकी आहे.
◼️ शेतीच्या विविध कामांमध्ये मनुष्यबळासाठी पर्याय म्हणून विद्यापीठातर्फे यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत विविध यंत्राची निर्मिती केली आहे.
◼️ नाचणीच्या कणसातून दाणे काढणी (मळणी) व त्यांना स्वच्छ करणे (सडणी) ही दोन्ही कामे करते.
◼️ दाणे व्यवस्थित वेगळे होत असल्यामुळे उत्पादन वाढते.
◼️ नाचणी सहणीचे काम यंत्रामुळे ९८ टक्के होते, यामुळे मजुरीच्या खर्चात बचत होत आहे.
◼️ विद्यापीठातर्फे हे यंत्र विक्रीसाठी शिवाय भाडेतत्वावर ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यांत्रिकीकरणामुळे काम झाले सुलभ
◼️ नाचणी काढणीनंतरच्या प्रक्रियेतील कष्ट कमी करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नाचणीचे मळणी, सहणी यंत्र उपयुक्त ठरणार आहे.
◼️ हाताळण्यास तसेच वापरण्यास ही सुलभ आहे. वेळेची, कष्टाची बचत होते. दाणे व्यतस्थित वेगळे झाल्याने उत्पादन वाढते.
◼️ या यंत्राचे वजन १४० किलो आहे. घरगुती सिंगल फेज मीटरवर हे यंत्र चालते.
◼️ मळणी, सग्रणी प्रक्रियेत शारीरिक कष्ट व धुळीच्या त्रासामुळे मानवी आरोग्यावरील होणाऱ्या परिणामाला विराम मिळत असल्याने ते लवकरच लोकप्रिय ठरेल.
अधिक वाचा: आधार कार्डवरील मोबाईल नंबर आता घरबसल्या करता येणार अपडेट; कशी आहे प्रक्रिया?
