Akshaya Tritiya Wishes : पळसाच्या पानांपासून पत्रावळी बनवणे हा एक पारंपरिक उद्योग आहे, जो आता कालानुरुप कमी होत चालला आहे. परंतु एरंडा गाव त्याला अपवाद ठरले आहे. या गावातील पळसाच्या पत्रावळींची (Patravali) अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्तावर मागणी वाढली आहे.
या उद्योगात पळसाच्या पानांपासून पत्रावळी (Patravali), ताटं आणि द्रोन (वाट्या) तयार केले जातात. या पत्रावळी जेवणासाठी वापरल्या जातात आणि त्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानल्या जातात.
अलीकडील काळात लग्न समारंभ व धार्मिक कार्यक्रमांमध्ये नैसर्गिक पळसाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळींच्या जागी प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळींचा वापर वाढला आहे.
ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक ठरत आहे. मात्र, अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक पळसाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळीला (Patravali) पुन्हा मागणी वाढली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील एरंडा गावातील सुमारे ५० कुटुंबे पारंपरिक पद्धतीने पळसाच्या पानांची पत्रावळी (Patravali) तयार करून बाजारात विक्रीसाठी पाठवतात. यामुळे या कुटुंबांना आर्थिक आधारही मिळत आहे.
काळानुसार प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळीला प्राधान्य मिळाले. पर्यावरणावर विपरीत परिणाम करणाऱ्या या कृत्रिम साहित्याच्या वापरामुळे नैसर्गिक साधनांचा वापर कमी झाला होता.
पळसाच्या पानापासून काय होते तयार?
पत्रावळी : पळसाच्या पानांपासून पत्रावळी बनवणे हा एक पारंपरिक उद्योग आहे. या पत्रावळी धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये जेवणासाठी वापरल्या जातात.
ताटं : पळसाच्या पानांपासून ताटं देखील बनवतात, जी जेवणासाठी वापरली जातात.
द्रोन : पळसाच्या पानांपासून लहान लहान आकारात वाट्या (द्रोन) बनवतात, ज्यांचा वापर जेवण आणि अन्य गोष्टींसाठी करतात.
पत्रावळी बनवण्याची प्रक्रिया असते तरी कशी?
पळसाची पाने तोडून त्यांची व्यवस्थित स्वच्छता करतात. नंतर, त्यांना विशिष्ट आकारात आणि डिझाइनमध्ये आकार दिला जातो, ज्यामुळे पत्रावळी, ताटं, द्रोन तयार होतात. लिंबाच्या काडीचा वापर पळसाच्या पत्रावळी शिवण्यासाठी केला जातो.
सातपुड्याच्या जंगलातून मिळते पळसाची पाने
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात पळसाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. येथून पाने गोळा करून घरी पत्रावळ्या तयार केल्या जातात. या कामात संपूर्ण कुटुंब सहभागी होते. बाजारात या पत्रावळीसाठी शेकडा ५०० ते ७०० रुपये दर मिळतो, अशी माहिती एरंडा येथील उद्योजक सुरेश निकोसे यांनी दिली.
अक्षय तृतीयेला पत्रावळीचा मान
पितृ पक्षात पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करताना व नैवेद्य वाढण्यासाठी पळसाच्या पत्रावळीचा वापर केला जातो. तसेच अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) दिवशीही देवाला नैवेद्य या पत्रावळीत दाखवण्याचे विशेष महत्त्व असते. त्यामुळे या काळात नैसर्गिक पळसाच्या पत्रावळीला बाजारात विशेष मागणी असते.
हे ही वाचा सविस्तर : Onion Market: ऐन हंगामात बाजारात दराचा रोलर कोस्टर; जाणून घ्या काय आहे कारण