Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्येसोबत दिवसेंदिवस झपाट्याने वाढणाऱ्या फळ प्रक्रिया उद्योगात आहेत मोठ्या संधी; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 17:23 IST

Fruits Processing : भारतात होणाऱ्या एकूण फळांच्या उत्पादनाच्या बारा टक्के एवढे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्राला म्हणूनच 'फ्रूट बास्केट ऑफ इंडिया' म्हणतात.

भारतात होणाऱ्या एकूण फळांच्या उत्पादनाच्या बारा टक्के एवढे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्राला म्हणूनच 'फ्रूट बास्केट ऑफ इंडिया' म्हणतात.

महाराष्ट्रात आंबा, द्राक्ष, संत्री, मोसंबी, पेरू, पपई, केळी, चिकू, डाळिंब इत्यादीं बरोबरच अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे येणारी महत्त्वाची व दुर्लक्षित राहिलेली फळझाडे उदा. आवळा, चिंच, सीताफळ, अंजीर, कवठ, जांभूळ, फणस, करवंद, कोकम, बोर इत्यादी फळझाडांचे देखील उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

फळांचे उत्पादन हंगामी स्वरुपाचे असल्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात फळे बाजारात येतात. ताज्या फळांची साठवणक्षमता कमी असल्यामुळे शेतकरी शेतावर फळे दीर्घकाळ साठवुन ठेवू शकत नाहीत.

परिणामी, शेवटी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. म्हणून अशा वेळी स्थानिक पातळीवर साखर कारखान्याच्या धर्तीवर फळांवर प्रक्रिया करुन मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे उद्योग सुरु झाले, तर फळांची नासाडी टाळून उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल.

देशात उत्पादित होणाऱ्या द्राक्षे, आंबा, संत्री, डाळिंब, कलिंगड, चिकू या ताज्या फळांची पाश्चात्य देशात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. त्याचप्रमाणे प्रक्रियायुक्त पदार्थांनाही देशात व परदेशांत मागणी वाढत आहे.

निरनिराळ्या फळांपासून उत्तम प्रतीचे प्रक्रिया पदार्थ तयार करता येतात, त्यांपैकी फळांचे जॅम व रस, हवाबंद केलेली फळे, निरनिराळी लोणची परदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात.

एकूण निर्यातीमध्ये फळांचे रस, पल्प, यांचा वाटा सुमारे २७ टक्के, तर सरबते आणि लोणची यांचा हिस्सा अनुक्रमे १३ व १२ टक्के एवढा आहे. त्याचप्रमाणे जॅम, जेली आणि स्कॅवशला सुध्दा चांगली मागणी आहे. 

भविष्यात भारतीय फळे व त्यापासुन तयार होणाऱ्या प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरु होणे, त्याचा ग्रामीण भागातही विस्तार होणे तसेच अशा युनिटमधून उत्तम प्रतीचे टिकाऊ प्रक्रिया पदार्थ तयार करणे हे फळ उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच देशाच्या हिताचे ठरणार आहे.

फळे व भाजीपाल्यापासून विविध मुल्यवर्धीत पदार्थ महिलांना घरगुती स्वरुपात कमी खर्चात तयार करण्याजोगे आहेत. ग्रामीण भागात शेतीच्या माध्यमातून कच्चामाल या व्यवसायासाठी उपलब्ध होईल. अनेक फळे व भाजीपाल्यापासून खाली नमूद केल्याप्रमाणे अनेक नाविन्यपूर्ण पदार्थ तयार करता येतात.

• केळी प्रक्रिया - कच्च्या केळीचे चिप्स, सुकेळी, केळीचा रसा, सरबत, केळी भुकटी, केळीचे वाईन, प्युरी, कॉन्सट्रेट, गर आणि टॉफी इत्यादी.

• आंबा प्रक्रिया - गर, रस, नेक्टर, टॉफी, मुरब्बा, जॅम, स्कॅश, सरबत, पेय, आंबापोळी, लोणचे इत्यादी.

• पपई प्रक्रिया - कॅन्डी, टुटी फ्रुटी, लोणचे, टॉफी, पेपेन, जॅम, मुरब्बा आणि गर इत्यादी.

• पेरु प्रक्रिया - गर, रस, पेय, जॅम, जेली, सॉस टॉफी, चिज, वाईन इत्यादी.

• चिकु प्रक्रिया - जॅम, सॉस, शरबत, मिल्क शेक, भुकटी इत्यादी.

• आवळा प्रक्रिया - रस, शरबत, स्क्रैश, मुरब्बा, कॅन्डी, च्यवनप्राश, लोणचे, सुपारी इत्यादी.

• डाळींब प्रक्रिया - रस, शरबत, अनारदाना, मनुका, चुरन, सायरप, सॉस, जेली इत्यादी.

• संत्रा, मोसबी, लिंबु प्रक्रिया - रस, शरबत, पेय, जेली, मार्मालेड, स्क्रॅश, सुगंधी तेल इत्यादी.

• सिताफळ प्रक्रिया - गर, मिल्क शेक, शरबत, टॉफी, रबडी, भुकटी इत्यादी.

• चिंच प्रक्रिया - सॉस, गर, कॉन्संट्रेट, पावडर, चिंचोका पावडर, टॅनीन इत्यादी.

हेही वाचा : आधुनिक शेती तंत्राच्या मदतीने साधला विकास; गजाननरावांनी केला पूर्ण पारंपरिक शेतीला मॉडर्न करण्याचा ध्यास

टॅग्स :शेती क्षेत्रफळेभाज्याअन्नशेतकरीव्यवसायशेतीफलोत्पादनकृषी योजना