पॉलीटनेल सोलर ड्रायर हे एक आधुनिक सौर उर्जेवर आधारित उपकरण आहे. जे मुख्यतः फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती आणि मसाले वाळवण्यासाठी वापरले जाते.
पारंपरिक पद्धतीने सूर्यप्रकाशात थेट अन्न वाळवणे जाते. परंतु पॉलीटनेल ड्रायरमध्ये विशेषतः नियंत्रित तापमानावर अन्न वाळवले जाते. यामुळे अन्नाचा दर्जा आणि पोषणमूल्ये टिकून राहतात.
polytunnel solar dryer पॉलीटनेल ड्रायरमध्ये अर्धलंबगोल आकाराचा गॅल्व्हनाईज्ड लोखंडी पाईप सांगाडा जमिनीलगत घट्ट बसवून त्यात ट्रे ठेवण्यासाठी रॅक करण्यात येतात. यामध्ये वरच्या बाजूला चिमण्या तयार करण्यात येतात जेणेकरून पाण्याची वाफ वर जाईल.
सांगाड्यावर पॉलीथीन कापड बसविले जाते. अशाप्रकारे पॉलीटनेल वाळवणी यंत्र तयार केले जाते. हे यंत्र उभारणी, दुरुस्ती आणि देखभाल करणे पर्यायाने सोपे असते.
पॉलीटनेल ड्रायरचे वैशिष्ट्ये
१) पॉलीटनेल ड्रायरमध्ये अन्न वाळवण्यासाठी बाह्य वातावरणापासून संरक्षण मिळते.
२) ड्रायरची रचना अशी असते की त्यामध्ये धूळ, कीटक आणि इतर घातक घटकांपासून अन्न सुरक्षित राहते.
३) हे मुख्यतः सौर उर्जेवर कार्य करते. यामुळे विजेचा खर्च कमी होतो आणि ड्रायरला पर्यावरणपूरक बनवले जाते.
४) या ड्रायरमध्ये तापमान नियंत्रित ठेवले जाते. जेणेकरून अन्नाची गुणवत्ता टिकून राहते.
५) हवेच्या नियंत्रित प्रवाहामुळे अन्नाचा रंग, चव आणि पोषणमूल्ये चांगली राहतात.
६) पॉलीटनेल ड्रायरमध्ये तापमान आणि हवेच्या प्रवाहाचा समन्वय असतो, ज्यामुळे वाळवण्याची प्रक्रिया जलद होते.
७) पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत पॉलीटनेल ड्रायरमध्ये वाळवलेले अन्न जास्त टिकाऊ असते.
८) लहान शेतकरी आणि गृहउद्योग उदा. पापड, शेवया, सांडगे, मसाला उद्योग, शिजवलेली हळद वाळविणे, सुंठ व बेदाणा निर्मिती बाजरीची खारवडी निर्मिती इ. प्रकारच्या व्यवसायांसाठी पॉलीटनेल ड्रायर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.
पॉलीटनेल ड्रायरसाठी खर्च
■ लहान पॉलीटनेल ड्रायर (२०-५० किलो क्षमतेसाठी) : अंदाजे रु. ५०,००० ते रु. १.५ लाख.
■ मध्यम आकाराचा पॉलीटनेल ड्रायर (५०-१०० किलो क्षमतेसाठी) : अंदाजे रु. १.५ लाख ते रु. ५ लाख.
■ मोठ्या औद्योगिक ड्रायरसाठी : १०० किलो पेक्षा जास्त क्षमतेच्या ड्रायरसाठी रु. ५ लाखांपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो.
पॉलीटनेल ड्रायरची देखभाल
१) ड्रायर नियमितपणे साफ करणे महत्त्वाचे आहे. यामुळे ड्रायरमध्ये धूळ राहत नाही.
२) अन्न सुरक्षिततेसाठी तापमान आणि हवेच्या प्रवाहाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.
आपल्या देशात ८ ते ९ महिने चांगला सूर्यप्रकाश असल्याने फळे आणि भाज्या वाळवून त्यापासून विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी सौर उर्जेवर चालविणारे वाळवणी यंत्र उपयुक्त ठरत आहे. पालक, मेथी या भाज्यांची वर्षभर मागणी असल्याने या भाज्या बाजारात ८ ते १० पट जास्त किमतीने विकल्या जातात. उदा. पालक ५०० ते ७०० रुपये/किलो, मेथी ८०० ते ९०० रुपये/किलो.
अधिक वाचा: मधुमक्षिकापालन हा कृषिपूरक व्यवसाय करून कमवा अधिकच उत्पन्न; योजनेसाठी आजच नोंदणी करा