भारतीय आहारसंस्कृतीत अनेक पारंपरिक अन्नपदार्थ पौष्टिकतेने समृद्ध आहेत. त्यापैकी शिंगाडा (Water Chestnut) हा एक महत्त्वाचा आणि आरोग्यदायी अन्नघटक मानला जातो.
पाणथळ भागात उगवणारा शिंगाडा हा हंगामी फलभाज्यांपैकी एक असून त्यापासून अनेक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार केले जातात. विशेषतः उपवासाच्या दिवसांमध्ये शिंगाड्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
विविध आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला शिंगाडा पोषक आणि बहुपयोगी जलवनस्पती अन्नघटक आहे. ताज्या स्वरूपात खाण्याबरोबरच त्यापासून अनेक मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने तयार केली जातात. आधुनिक अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानामुळे शिंगाड्याचे दीर्घकाळ साठवणूक करणे शक्य आहे.
तसेच आकर्षक पॅकिंग करून बाजारपेठेत विक्रीयोग्य पदार्थ तयार करणे शक्य झाले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी तसेच बेरोजगार तरुणांसाठी शिंगाडा प्रक्रिया उद्योग तथा मूल्यवर्धित उत्पादने हा व्यवसाय एक सुवर्णसंधीच आहे. शिंगाडापासून विविध उत्पादने तयार केली जाऊ शकतात. यातीलच काही उत्पादनांची प्रक्रिया जाणून घेऊया.
शिंगाडा पीठ (Singhada Flour) उत्पादन प्रक्रिया तंत्रज्ञान
• स्वच्छता व धुलाई (Cleaning and Washing) ताजे शिंगाडे स्वच्छ पाण्याने धुतले जातात.
• सोलणे (Peeling) बाहेरील कठीण साल काढली जाते.
• कापणे व वाळवणे (Slicing & Drying) दाणे कापून सूर्यप्रकाशात किंवा ट्रे ड्रायरमध्ये वाळवले जातात.
• दळणे (Grinding/Milling) वाळलेले दाणे ग्राइंडरमध्ये दळून बारीक पीठ तयार केले जाते.
• चलनीकरण व पॅकेजिंग (Sieving & Packaging) पीठ चलनी करून हवाबंद पॅकेजमध्ये भरले जाते.
उपयोग : पुरी, पराठा, हलवा, पकोडे, थालीपीठ, ग्लूटेन-फ्री बेकरी उत्पादने.
शिंगाडा स्टार्च (Water Chestnut Starch) उत्पादन प्रक्रिया तंत्रज्ञान
• शिंगाड्याचे दाणे क्रशिंग किंवा ग्राइंडिंग करून पेस्ट तयार केली जाते.
• त्यामध्ये पाणी घालून फिल्ट्रेशन केले जाते.
• गाळलेले द्रव काही वेळ स्थिर ठेवून सेडिमेंटेशन (तळाशी साचणे) होऊ दिले जाते.
तळाशी जमा झालेला स्टार्च काढून वाळवून पावडर तयार केली जाते.
उपयोग : सूप, सॉस, नूडल्स, बेबी फूड आणि जेली पदार्थांमध्ये घट्टपणा आणण्यासाठी.
शिंगाडा चिप्स उत्पादन प्रक्रिया तंत्रज्ञान
• शिंगाडे धुवून सोलले जातात.
• स्लायसिंग मशीनने पातळ काप केले जातात.
• कापांना मीठ किंवा मसाल्याच्या द्रावणात हलके ब्लांचिंग केले जाते.
• डीप फ्रायिंग किंवा हॉट एअर ड्रायिंग करून कुरकुरीत चिप्स तयार होतात.
• थंड झाल्यावर सीलबंद पॅकेजिंग केले जाते.
उपयोग : आरोग्यदायी स्नॅक्स म्हणून.
शिंगाडा बर्फी व हलवा उत्पादन प्रक्रिया तंत्रज्ञान
• शिंगाडा पीठ तुपात रोस्टिंग केले जाते.
• त्यामध्ये साखरेचा पाक किंवा गूळ घालून कुकिंग केले जाते.
• मिश्रण घट्ट झाल्यावर मोल्डिंग किंवा ट्रे सेटिंग करून बर्फीचे तुकडे केले जातात.
उपयोगः सण, उपवास व पारंपरिक मिठाई उद्योग.
शिंगाडा रेडी-टू-ईट स्नॅक्स
उदाहरणे : कटलेट, टिक्की, नमकीन मिश्रण.
प्रक्रिया तंत्रज्ञान : शिंगाडा पीठ किंवा उकडलेले शिंगाडे मॅशिंग करून मिश्रण तयार केले जाते., मसाले व इतर घटक मिसळून फॉर्मिंग (कटलेट/टिक्की आकार) केले जाते., डीप फ्रायिंग किंवा बेकिंग करून तयार केले जाते., मोठ्या उद्योगांमध्ये IQF (Individual Quick Freezing) तंत्रज्ञान वापरून साठवणूक केली जाते.
शिंगाडा बेकरी उत्पादने
उदाहरणे : केक, बिस्किटे, पॅनकेक, एनर्जी बार.
प्रक्रिया तंत्रज्ञान : शिंगाडा पीठ इतर घटकांसोबत मिक्सिंग केले जाते., डो फॉर्मेशन करून आकार दिला जातो., बेकिंग ओव्हनमध्ये योग्य तापमानावर भाजले जाते., थंड करून पॅकेजिंग व लेबलिंग केले जाते.
शिंगाडा पावडर व हेल्थ ड्रिंक
प्रक्रिया तंत्रज्ञान : वाळवलेले शिंगाडे पल्वरायझरमध्ये दळले जातात., त्यामध्ये सुकामेवा पावडर, साखर किंवा गूळ मिसळून हेल्थ मिक्स तयार केले जाते., हे दूध किंवा पाण्यात मिसळून पौष्टिक पेय म्हणून वापरले जाते.
वरील विविध उत्पादनाच्या महितीतून आपल्याला ही लक्षात आले असेलच की, आधुनिक अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानामुळे शिंगाड्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे शक्य झाले आहे. यामुळे केवळ ग्राहकांना पौष्टिक खाद्यपदार्थ मिळत नाहीत, तर ग्रामीण भागात अन्नप्रक्रिया उद्योग, लघुउद्योग आणि रोजगाराच्या संधी देखील वाढतात.
डॉ. सोनल रा. झंवर
साहाय्यक प्राध्यापक
एम. जी. एम अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,
गांधेली, छ. संभाजीनगर.
