नाशिक : सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या (Kadawa Sugar Factory) गळीत हंगामाचा शुभारंभ मान्यवरांचे हस्ते उसाची मोळी टाकून करण्यात आला. त्या प्रसंगी झिरवाळ बोलत होते. श्रीराम शेटे यांनी उत्पादन वाढ ही आजची गरज असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व एआयचा वापर करून एकरी उत्पादन वाढवावे. प्रत्येक सभासदाने ऊस लागवड करावी असे आवाहन केले.
यावेळी मंत्री झिरवाळ म्हणाले, की नैसर्गिक आपत्तींमुळे शेती संकटात सापडला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येत आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊसाची लागवड करावी. परिसरात पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना
महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून नाशिकच्या (Nashik) दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याची ओळख आहे. कर्मवीर कै. राजाराम सखाराम वाघ यांनी या कारखान्याची सुरुवात केलीय. या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम 1978 साली सुरू झाला. या कारखान्यासाठी कच्चा माल म्हणजेच ऊस दिंडोरी, निफाड, नाशिक, कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उपलब्ध होतो.
