Millet Milk : मिलेट दूध हे पारंपारिक भरडधान्यापासून तयार होणारे एक आधुनिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक उत्पादन आहे. हे दूध विविध पारंपारिक व औद्योगिक पद्धतींनी तयार करता येते आणि त्यामध्ये स्वाद, पोषणमूल्य आणि टिकाऊपणा यांचा समतोल साधलेला असतो. विशेषतः लॅक्टोज इन्टॉलरंट व्यक्तींना, दुग्धप्रथिनांची ॲलर्जी असणाऱ्यांना आणि व्हेगन किंवा वनस्पतीजन्य आहार पाळणाऱ्या लोकांसाठी हे दूध एक सुरक्षित, सुलभ व नैसर्गिक पर्याय ठरतो.
भरडधान्यांना रडधान्यांना अलीकडील काळात त्यांच्या पोषणमूल्य आणि कोरडवाहू हवामानात वाढण्याच्या क्षमतेमुळे नव्याने महत्त्व मिळाले आहे. परंपरेने आशिया आणि आफ्रिकेतील अनेक भागात या धान्यांचा आहारात वापर केला जातो. मिलेट्समध्ये आहारतंतू (डायटरी फायबर), कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यासारखी आवश्यक खनिजे विपुल प्रमाणात असतात आणि हे तृणधान्य ग्लूटेन-मुक्त असतात.
या भरड धान्यांचा एक नाविन्यपूर्ण उपयोग म्हणजे भरड धान्य किंवा मिलेट दूध जे भरड धान्यांपासून तयार केले जाते आणि गाई/म्हशीच्या दुधाचा पर्याय म्हणून वापरले जाते. मिलेट दूध विशेषतः लॅक्टोज असहिष्णुता व्यक्तींमध्ये उपयुक्त ठरते. लॅक्टोज इन्टॉलरंट म्हणजे अशा व्यक्तींमध्ये लॅक्टेज (lactase) हे संप्रेरक नसते किंवा कमी प्रमाणात असते.
त्यामुळे गाईच्या दुधातील साखर (लॅक्टोज) त्यांना पचत नाही आणि पोटफुगी, मळमळ, अपचन अशा समस्या उद्भवतात. अलीकडे व्हेगन डायट व वनस्पतीजन्य आहार ही संकल्पना जगभर झपाट्याने वाढत आहे. नैतिक, आरोग्यविषयक व पर्यावरणपूरक कारणांमुळे लोक दुग्धजन्य पदार्थांऐवजी वनस्पती-आधारित पर्याय निवडत आहेत. अशा परिस्थितीत सोया, बदाम, ओट्स व नारळाच्या दुधासोबतच मिलेट दूध देखील लोकप्रिय होत आहे.
या दुधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जसे की,
- पचन सुधारते, अँटिऑक्सिडंट्सचा भरपूर पुरवठा होतो.
- कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि हृदयासाठी उपयुक्त पोषकतत्त्वे मिळतात.
- शिवाय हे दूध कोलेस्टेरॉलमुक्त, कमी संतृप्त चरबीचे आणि सहज पचणारे असते.
- आजच्या काळात दुग्धविहीन, स्वच्छ लेबल असलेले आणि आरोग्यवर्धक पेये यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
- अशा परिस्थितीत मिलेट दूध एक आरोग्यपूरक, शाश्वत व पर्यावरणस्नेही पर्याय म्हणून उदयाला आला आहे, जो सर्व वयोगटांतील व्यक्तींना योग्य ठरतो.
- श्रीमती काजल नवनाथ तांबवे, पी. हेमाशंकरी,
शास्त्रज्ञ, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन विभाग, भारतीय श्री अन्न अनुसंधान संस्थान, राजेंद्रनगर (हैद्राबाद, तेलंगणा)