इस्माईल जहागिरदार
चिकाटी, मेहनत आणि नवे प्रयोग करण्याची तयारी असेल, तर अगदी मर्यादित साधनांतही मोठे यश मिळवता येते, हे वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील प्रयोगशील शेतकरी सदाशिव आडकिणे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. (Farmer Success Story)
केवळ ६ एकर शेतीवर करवंदाची लागवड करत त्यांनी आज सुमारे १ कोटी रुपयांचा भव्य फळप्रक्रिया उद्योग उभा केला असून, त्यांच्या या 'करवंद क्रांती'ची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे.(Farmer Success Story)
१४ वर्षांची मेहनत; आज यश शिखरावर
सदाशिव आडकिणे यांनी गेल्या १४ वर्षांपासून करवंद शेतीवर लक्ष केंद्रित केले. पारंपरिक पिकांऐवजी कमी पाण्यात येणाऱ्या आणि बाजारात वेगळी ओळख असलेल्या करवंदाची निवड त्यांनी केली.
सुरुवातीला अनेक अडचणी, बाजारपेठेचा अभाव आणि तांत्रिक अडथळे होते, पण जिद्द न सोडता त्यांनी सातत्य ठेवले.
आज त्यांच्या शेतातून दरवर्षी ३० ते ३५ टन करवंद उत्पादन मिळत असून, ते इतर शेतकऱ्यांकडूनही करवंद खरेदी करून प्रक्रिया उद्योगासाठी वापरत आहेत.
१ कोटींचा फळप्रक्रिया उद्योग
करवंदाचे उत्पादन वाढल्यानंतर केवळ कच्चा माल विकण्याऐवजी मूल्यवर्धन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
वसमत येथे सुमारे १ कोटी रुपये गुंतवून आधुनिक फळप्रक्रिया उद्योग उभारला.
या उद्योगात सध्या पुढील उत्पादने तयार केली जातात:
करवंद चेरी, करवंद लोणचे, आंबा लोणचे
करवंद चेरीला राज्यभर मागणी
आडकिणे यांच्या करवंद चेरीला बाजारपेठेत मोठी पसंती मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक यांसारख्या शहरांसह संपूर्ण राज्यातून मागणी वाढत आहे.
दर: १६० ते २८० रु. प्रति किलो
उत्पादन: वर्षाला ३० टनांपर्यंत
या उत्पादनामुळे त्यांना स्थिर आणि चांगला नफा मिळू लागला आहे.
लोणच्यापासून वाइनपर्यंतचा प्रवास
आडकिणे यांनी केवळ पारंपरिक उत्पादनांवर न थांबता नव्या प्रयोगांची वाट धरली.
करवंदापासून वाइन तयार करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयोग ठरला.
नांदेड येथील कृषी प्रदर्शनात त्यांच्या करवंद वाइनची बोली लावून विक्रीही करण्यात आली. भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाइन उत्पादन करून नवीन बाजारपेठ निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान
सदाशिव आडकिणे यांची यशोगाथा अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
* शून्यातून उभा केलेला उद्योग
* कमी पाण्यातील पिकावर भर
* मूल्यवर्धनातून वाढलेले उत्पन्न
यामुळे राज्यासह परराज्यातील शेतकरी इंजनगाव येथे भेट देऊन माहिती घेत आहेत.
ग्रामीण तरुणांसाठी नवी दिशा
फळप्रक्रिया उद्योगामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती झाली आहे. ग्रामीण भागातील तरुणांना शेतीसोबत उद्योगाची जोड देण्याचा मार्ग या उपक्रमातून दिसून येत आहे.
यशाचा मंत्र
करवंदापासून लोणचे आणि चेरी तयार करून आम्ही हक्काची बाजारपेठ निर्माण केली. आता वाइन उत्पादनावर भर देत आहोत. - सदाशिव आडकिणे, प्रयोगशील शेतकरी
मर्यादित जमीन, प्रतिकूल परिस्थिती आणि कमी संसाधन असूनही सदाशिव आडकिणे यांनी जिद्द, नवोपक्रम आणि मेहनतीच्या जोरावर ‘करवंद क्रांती’ घडवून आणली. त्यांची ही वाटचाल शेतकऱ्यांना केवळ शेती न करता ‘अॅग्री-उद्योजक’ बनण्याची प्रेरणा देणारी ठरत आहे.
