जळगाव : गेल्या तीन दशकांपासून कुलूपबंद असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या (वनकोठे, ता. एरंडोल) पुनरुज्जीवनासाठी अखेर हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेने या कारखान्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे सात तालुक्यांमधील शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या कारखान्याच्या विक्रीचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीला ज्येष्ठ नेते संचालक आमदार एकनाथ खडसे, अनिल पाटील, गुलाबराव देवकर, चिमणराव पाटील, जयश्री महाजन यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते.
पुढील प्रक्रिया काय?
कारखान्याची मूळ किंमत (अपसेट प्राईज) ठरवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला कळविले आहे. त्यांची तज्ज्ञ टीम लवकरच कारखान्यात येऊन यंत्रसामग्री आणि जमिनीची पाहणी करेल. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून विक्रीची अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
वसंत सहकारी साखर कारखाना हा या परिसरातील शेतकऱ्यांचा कणा आहे. गेली ३० वर्षे हा प्रकल्प बंद असल्याने शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे मोठे नुकसान झाले. माझे वडील स्व. मुरलीधर पवार यांचे हे स्वप्न होते की हा कारखाना सदैव सुरू राहावा. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही आता हा कारखाना विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून नवीन गुंतवणूकदार हा कारखाना तिथेच सुरू करेल. आमचा मुख्य उद्देश नफा कमवणे नसून शेतकऱ्यांचा ऊस गाळला जावा आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा हाच आहे.
- संजय पवार, अध्यक्ष, जळगाव जिल्हा बँक.
