नाशिक : बागलाण तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचा २६वा गळीत हंगाम उत्साहात सुरू झाला असून, यंदा सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उसाला योग्य भाव देण्यासाठी कारखाना कमी पडणार नाही, तसेच शेतकऱ्यांनी एकरी शंभर मेट्रिक टनांपर्यत झेप घ्यावी, असे कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी सांगितले.
द्वारकाधीश मंदिरात अध्यक्ष शंकरराव सावंत, उपाध्यक्ष चंद्रकला सावंत, संचालक कैलास सावंत आणि डॉ. वर्षा पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यंदा कारखान्याला डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, पुणे यांचा 'सर्वोत्कृष्ट साखर कारखाना' व 'सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन' पुरस्कार प्राप्त झाला आहे, तसेच कार्यकारी संचालकपदाच्या परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल जनरल मॅनेजर बाळासाहेब करपे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, कारखाना ऊस उत्पादक केंद्रबिंदू मानून कार्य करतो. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक टन मोफत बेणे, खते, औषधे बिनव्याजी देऊन दहा कोटी रुपयांचा विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. गाळपानंतर पंधरा दिवसांत पहिला हप्ता देण्यात येईल, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने लागवडीवर भर देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. डॉ. वर्षा पाटील यांनी कारखान्याच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पहिली उसाची बैलगाडी आणि ट्रकचे पूजन मुख्य शेतकी अधिकारी विजय पगार यांच्या हस्ते झाले. यावेळी बागलाण, कळवण, साक्री, निफाड, चाळीसगाव आणि नवापूर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बागलाण, कळवण, साक्री, निफाड, चाळीसगाव आणि नवापूर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
