कोल्हापुरी मसाल्यांचा इतिहास हा कोल्हापूरच्या सांस्कृतिक, भौगोलिक व सामाजिक घडामोडींशी घट्टपणे जोडलेला आहे. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि समृद्ध खाद्यसंस्कृती असलेले शहर आहे.
कोल्हापूर कृषिप्रधान जिल्हा असून, येथे भरपूर प्रमाणात मिरची, खोबरे, कांदा, लसूण, आदींचे उत्पादन होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या मसाल्यांचे मिश्रण विकसित केले. या मसाल्यांत कमी खर्चात अधिक चव मिळवण्याकडे लक्ष दिले गेले आहे.
कोल्हापुरी मसाले लोकप्रिय का?
१) तिखटपणा, चव
कोल्हापुरी मसाले म्हणजे झणझणीत, ठसकेबाज आणि मसालेदार चव यासाठी ओळखले जातात. लाल मिरची, सुके मसाले, सुगंधी घटक यांचा अचूक समतोल यात असतो.
२) पारंपरिक पद्धत
तांबडा, पांढरा रस्सा, मिसळ, झणझणीत भाजी ही या मसाल्याशिवाय अपुरी वाटतात. पारंपरिक पद्धतीने बनवलेले मसाले आजही लोकांना अस्सल चव देतात.
३) व्यावसायिक लोकप्रियता
आज अनेक कोल्हापुरी मसाल्यांचे ब्रांड्स स्थानिक बाजारपेठेत आणि ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. देशभरातील हॉटेल्स आणि घरगुती स्वयंपाकात हे मसाले वापरले जातात. परदेशात राहणारे महाराष्ट्रीयन आणि भारतीय लोकही हे मसाले मागवतात.
४) खाद्यसंस्कृतीतील वेगळेपणा
कोल्हापुरी मसाले फक्त तिखट नसून त्यातला खमंगपणा, सुगंध आणि रस्सा बनवताना येणारी एक वेगळीच उबदार चव ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे इतर प्रादेशिक मसाल्यांपेक्षा त्यांना अधिक पसंती मिळते.
कोल्हापुरी मसाले बनविण्याची वैशिष्ट्ये
१) घरगुती पद्धत
अनेक घरांमध्ये मसाले भाजून व टाकून खास पारंपरिक पद्धतीने तयार केले जातात.
२) तिखट व मसालेदार
हे मसाले तुलनेने इतर ठिकाणच्या मसाल्यांपेक्षा अधिक तिखट आणि सुगंधी असतात.
३) साठवता येण्याजोगे
हे मसाले बनवले की महिनाभर टिकू शकतात.
४) स्थानिक हवामान आणि पीक उत्पादन
कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात लाल मिश्चीचे (विशेषतः बेडगी, लवंगी) भरपूर उत्पादन होते. यामुळे झणझणीत आणि दाट रंगाचे मसाले तयार करणे शक्य होते. इतर मसालेसुद्धा (धणे, जिरे, हळद, लसूण, सुंठ आदी) स्थानिक पातळीवर उपलब्ध होतात.
- दीपक मोरे
वरिष्ठ उपसंपादक
अधिक वाचा: राज्यात 'या' ठिकाणी हरतालिका ते ऋषीपंचमी या चार दिवसांत पाऊस सक्रिय होणार