बोर फळ आणि त्यापासून तयार होणारी विविध उत्पादने
बोर फळ हे भारतात मोठ्या प्रमाणावर आढळणारे आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असलेले एक अत्यंत लोकप्रिय फळ आहे. तसेच, बोर फळाची विविध आरोग्यदायी फायदे आहेत, ज्यामुळे ते पोषणसंपन्न आहाराचा घटक बनले आहे.
आधुनिक काळात शेतकऱ्यांसाठी बोर एक उत्तम उत्पन्नाचे साधन आहे. हे फळ पारंपरिक आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते, ज्यामध्ये जीवनसत्त्व C, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आणि पोटॅशियम अशा आवश्यक पोषकद्रव्यांचे प्रमाण भरपूर असते.
बोर फळाचे नियमित सेवन शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यास मदत करते. तसेच, पचनक्रिया सुधारण्यासाठी, रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, आणि थकवा व अशक्तपणा कमी करण्यासाठी देखील बोर उपयुक्त आहे.
मात्र बोरांचा हंगाम वगळता इतर वेळेस सहसा बोर मिळत नाही. तेव्हा प्रक्रियायुक्त उत्पादनाच्या मदतीने बोरांची दुर्मिळ होत चाललेली चव आपण राखून ठेवू शकतो. तसेच यातून उद्योग देखील उभा राहू शकतो. कारण सध्याचा बाजाराचा विचार करता यामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी आहेत.
मुरंबा
बोर मुरंबा हा पारंपरिक व अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे. कोवळी व मध्यम पिकलेली बोर फळे निवडून त्यांची साल काढली जाते व साखरेच्या पाकात शिजवून मुरंबा तयार केला जातो.
यामध्ये बोरमधील जीवनसत्त्व ८ बऱ्याच प्रमाणात टिकून राहते. मुरंबा हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देतो, पचन सुधारतो आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे.
चटणी
बोरापासून तयार होणारी चटणी ही आंबट-गोड आणि किंचित तिखट चवीची असते. पिकलेल्या किंवा अर्धपिकलेल्या बोरांचा गर, गूळ किंवा साखर, मीठ व मसाले मिसळून ही चटणी तयार केली जाते.
ही चटणी भूक वाढवते आणि पारंपरिक जेवणाची चव अधिक खुलवते. ग्रामीण भागात ती रोजच्या जेवणात वापरली जाते.
सुकवलेले बोर (ड्राय बेर)
बोर फळे उन्हात किंवा यांत्रिक ड्रायरमध्ये वाळवून सुकाबोर तयार केले जातात. वाळवलेल्या बोरांचा साठवण कालावधी जास्त असतो. सुकाबोर हे नैसर्गिक ऊर्जा देणारे बँक असून प्रवासात, उपवासात किंवा हलक्या भुकेसाठी उपयुक्त ठरते.
ज्यूस व स्कॅश
पूर्णपणे पिकलेल्या बोरांचा रस काढून गाळणी करून बोर ज्यूस तयार केला जातो. हा रस जीवनसत्त्वांनी समृद्ध असून थंड पेय म्हणून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
नैसर्गिक गोडीमुळे साखरेचे प्रमाण कमी ठेवता येते, त्यामुळे हा ज्यूस आरोग्यदायी मानला जातो.
बोराच्या रसात साखर, सायट्रिक ॲसिड व संरक्षक घालून स्कॅश तयार केला जातो. हा स्कॅश पाण्यात मिसळून पेय म्हणून वापरला जातो. दीर्घकाळ टिकणारे आणि वाहतुकीस सोपे असल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून हे उत्पादन फायदेशीर ठरते.
जॅम व जेली
बोराच्या गरापासून तयार होणारा जॅम चविष्ट आणि पौष्टिक असतो. साखर व पेक्टिन घालून योग्य घट्टपणा आणला जातो. हा जॅम ब्रेड, बिस्किटे, केक आणि इतर बेकरी पदार्थांसोबत वापरला जातो.
कँडी
बोर कँडी तयार करण्यासाठी बोराच्या फोडी साखरेच्या पाकात भिजवून नंतर वाळवल्या जातात. ही कँडी चघळण्यास गोड व स्वादिष्ट असते. लहान मुलांसाठी तसेच प्रवासात खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
पावडर
सुकवलेल्या बोरांचे बारीक पूड करून बोर पावडर तयार केली जाते. ही पावडर आयुर्वेदिक औषधे, हेल्थ ड्रिंक्स आणि पोषणपूरक पदार्थांमध्ये वापरली जाते.
वाइन व सिरप
काही भागांत बोर फळाच्या किण्वनातून वाइन तयार केली जाते. तसेच बोर सिरप औषधी व पोषणात्मक पेय म्हणून वापरात आहे. ही उत्पादने आधुनिक अन्नप्रक्रिया उद्योगात नव्याने विकसित होत आहेत.
आर्थिक व औद्योगिक महत्त्व
बोर फळावर प्रक्रिया केल्यामुळे त्याची बाजारपेठ वाढते आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो. ग्रामीण भागात महिला बचतगट व लघुउद्योगांसाठी बोर प्रक्रिया उद्योग रोजगारनिर्मितीचे साधन ठरू शकतो. तसेच तरुणांसाठी एक यशस्वी प्रक्रिया उद्योग निर्माण होऊ शकतो.
डॉ. सोनल रा. झंवर
साहाय्यक प्राध्यापक
एम. जी. एम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर.
हेही वाचा : Bajra Biscuits : आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बाजरीचे मूल्यवर्धित बिस्किट्स
