शेतातून खणून काढलेली हळद आपल्या रोजच्या उपयोगासाठी वापरता येत नाही. ती शिजवून प्रक्रिया करून वापरावी लागते. हळद ही लोखंडी कढईमध्ये पारंपरिक पद्धतीने शिजवली जाते.
पारंपारिक पद्धत
- कढईत हळद भरून वर हळदीचा पाला किंवा गोणपाट टाकून कढईचे वरचे तोंड बंद करून हळद शिजवली जाते.
- काही ठिकाणी कढईच्या वर अर्धगोलाकार पद्धतीने हळद भरून वर तोंड पाला टाकून चिखल मातीने लिंपून घेऊन हळद शिजवली जाते.
- कढईत जेवढी हळद जास्त तेवढा जास्त वेळ हळद शिजविण्यासाठी लागतो.
नवीन पद्धत
- हळद शिजविण्याच्या नवीन पद्धतीनुसार तेलाच्या बॅरलचे सच्छिद्र ड्रम तयार करून त्यामध्ये हळद भरून मूळच्या कढईत फक्त पाणी टाकून उकळत्या पाण्यात हे योग्य प्रकारे शिजते.
- या कामी कमी वेळ, कमी मजूर, कमी इंधन लागते. अशा मालास चांगली चकाकी येते. परिणामी चांगला बाजारभाव मिळतो.
- अशा पद्धतीचा वापर केल्यास कमी वेळात हळद व्यवस्थित शिजवली जाते आणि श्रम, मजूर, इंधन यांचा अपव्यय टाळता येतो.
हळद शिजवल्यानंतरची प्रक्रिया
- शिजवलेली हळद ही चांगल्या कठीण फरशीच्या किंवा सिमेंट कॉंक्रीटच्या खळ्यावर वाळवावी लागते.
- त्यासाठी ताडपत्री किंवा बांबूच्या चटयांचा वापर केला जातो. हळद वाळविण्यासाठी जमिनीवर टाकू नये.
- हळद वाळविण्यासाठी दहा ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. ढगाळ हवामान असेल तर हळद वाळविण्यासाठी जास्त दिवस लागतात.
- पाऊस, दव, धुके यापासून हळदीचे रक्षण करावे. पावसाची शक्यता असल्यास सायंकाळी हळद गोळा करावी व ताडपत्रीखाली झाकून ठेवावी.
- पुन्हा दुसऱ्या दिवशी उन्हात पसरावी वाळत घातलेली हळद भिजल्यास तिच्या प्रतीवर परिणाम होतो. परिणामी मालास चांगला भाव मिळत नाही.
हळद वळवल्यानंतरची प्रक्रिया
- शिजवून, वाळवून तयार झालेली हळद विक्रीसाठी पाठवली जात नाही. कारण ती आकर्षक दिसत नाही.
- हळकुंडावर साल व मातीचा थर बसलेला असतो. त्यासाठी हळद ही कठीण पृष्ठभागावर घासावी लागते.
- घासल्यानंतर हळकुंडावरील साल व मातीचे कण निघून जातात व हळकुंड गुळगुळीत होते.
- त्याला चांगली चकाकी व पिवळेपणा येतो आणि ते आकर्षक दिसते. अशा मालास चांगला बाजारभाव मिळतो.
- यासाठी हळद पॉलिश करणे गरजेचे आहे. हळद कमी असल्यास गोणपाटाने पॉलिश करणे गरजेचे आहे.
पॉलिशसाठी ड्रमचा वापर
- जास्त हळद असल्यास पाण्याच्या बॅरलचा ड्रम तयार करून त्याला सर्वत्र छित्र पाडून स्टॅण्ड व कणा बसवून त्याचा उपयोग पॉलिशसाठी करता येतो.
- याशिवाय याच तत्त्वावर मोठे डबे तयार करून ते इलेक्ट्रिक मोटारवर फिरवून हळदीचे पॉलिश व्यापारी तत्त्वावर करून मिळते.
- सध्या तयार हळद पावडरसाठी वाढती मागणी असल्याने बचत गटाच्या माध्यमातून हा व्यवसाय जोमाने सुरू आहे.
अधिक वाचा: नारळापासून विविध पदार्थ बनविण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलंय हे नवीन यंत्र; वाचा सविस्तर