पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:20 AM2024-05-13T00:20:49+5:302024-05-13T00:21:51+5:30

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या एकदिवस आधीच पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

ravindra dhangekar allegations on bjp workers of money distribution at sahakar nagar, pune, Lok Sabha Election 2024 | पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सोमवारी (दि.१३) चौथ्या टप्प्याच मतदान होत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या एकदिवस आधीच पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

सहकारनगर भागात भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैशांचे वाटप करीत आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. मात्र तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. पोलीस प्रशासनाविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले असून सहकारनगर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी शरद पवार गटाचे नितीन कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जोपर्यंत पोलीस कारवाई करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजपा मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर काढणार आणि त्याचा वापर पुण्याच्या निवडणुकीमध्ये करणार असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर कालपासून करत आहेत. 

याच पार्श्वभूमीवर आज सकाळी रवींद्र धंगेकर यांनी आयोगाला पत्र लिहिले होते. या पत्रात पुणे मतदारसंघातील कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करावेत अशी मागणी केली होती. दरम्यान, पुण्यात महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे.

Web Title: ravindra dhangekar allegations on bjp workers of money distribution at sahakar nagar, pune, Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.