'पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधींकडून शिका'; प्रियंका गांधींची मोदींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 01:00 PM2024-05-11T13:00:12+5:302024-05-11T13:15:54+5:30

Priyanka Gandhi : नंदुरबार इथल्या सभेत बोलताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली

Nandurbar Loksabha Election Cry like child Priyanka Gandhi criticizes PM Modi | 'पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधींकडून शिका'; प्रियंका गांधींची मोदींवर बोचरी टीका

'पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधींकडून शिका'; प्रियंका गांधींची मोदींवर बोचरी टीका

Nandurbar Loksabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेजवर येऊन लहान मुलासारखे रडतात असं म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी बोचरी टीका केली आहे. मोदी आदिवासी आणि गरीबांच्याबाबतीत बोलतात एक आणि करतात एक, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. नंदुरबार लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी यांच्या सभेसाठी प्रियंका गांधी महाराष्ट्रात आल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला.

नंदुरबारमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवार हीना गावित यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी गोपाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी नंदुरबारमध्ये आल्या आहेत. सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला. भाजप आदिवासींवर अत्याचार करत असल्याची टीका प्रियांका गांधी यांनी केली.

मोदी लहान मुलांसारखे रडतात - प्रियंका गांधी

"मोदींच्या भाषणात वजन नाही. तुमच्याकडे सगळी सत्ता आहे. तुमचेच लोक म्हणतात मोदी जगातील मोठे नेते आहेत. पण निवडणुकीच्या वेळी मंचावर येताच लहान मुलांसारखे रडायला लागतात. मला शिव्या दिल्या असे मोदी म्हणतात. जरा हिम्मत करा मोदीजी हे सार्वजनिक आयुष्य आहे. इंदिरा गांधी यांच्याकडून शिका. त्या दुर्गारुपी महिलेकडून शिका ज्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यांच्यात किती हिम्मत होती ते बघा. पण तुम्ही त्यांच्याकडून काही शिकणार नाही. कारण तुम्ही त्यांना देशद्रोही म्हणता. मग तुम्ही काय शिकणार. १० वर्षात जनतेसाठी काय केलं हे सांगायची हिम्मत तुमच्यात नाही," असं म्हणत प्रियंका गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

मोदी मंचावर येऊन मोठ्या गोष्टी करतात

"आदिवासींवर जेव्हा अत्याचार झाले तेव्हा मोदींसह त्यांचे मंत्री गप्प बसले होते. तुम्ही मणिपूरमध्ये पाहिलं असेल महिलांसोबत अत्याचार झाले. पण पंतप्रधान गप्प होते आणि त्यांनी एक बोट नाही वर केलं. हे यांचे सत्य आहे. जेव्हा तुम्ही अधिकारसाठी आवाज उठवता तेव्हा गप्प केलं जातं. तुमच्या समाजावर भाजप हल्ला करत आहे. मंचावर येऊन मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्याकडून भाजपचे सरकार नवीन संसदेचे उद्धघाटन करत नाही," अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.

"एकीकडे चांगल्या गोष्टी बोलतात आणि दुसरीकडे आदर द्यायची वेळ येते तेव्हा मागे जातात. मोदी आदिवासी आणि गरीबांच्याबाबतीत बोलतात एक आणि करतात एक. राजकीय हेतूने मोदी तुमच्यापुढे येतात. तुमच्यासमोर छान छान गोष्टी करतात. पण त्यांचा पक्ष तुमचा अपमान करतो आणि ते काहीच बोलत नाही.  मोदी इथे काल आले होते तेव्हा त्यांनी सांगितले की मी शबरीचा पुजारी आहे. तुम्ही स्वतः हसत आहात मी काय बोलू," असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.

Web Title: Nandurbar Loksabha Election Cry like child Priyanka Gandhi criticizes PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.