'विलासरावांकडे बोट दाखवत लोकं म्हणायचे, ते पाहा बाभुळगावचे दिलीपकुमार'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 10:42 AM2021-07-08T10:42:45+5:302021-07-08T11:13:29+5:30

विलासराव यांच्या सूनबाई आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांनी ट्विट करुन विलासराव आणि दिलीप कुमार यांच्या आठवणी जागवल्या आहेत.

बॉलिवूडचे ट्रेजेडी किंग म्हणून प्रचलित असणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. अभिनेता आणि राजकीय नेता यांच्यातील संबंध अनेकदा आपण वाचले असतील.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि दिलीप कुमार यांच्यातही अखेरपर्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. तर, दिवंगत विलासराव देशमुख यांचेही ते स्नेही होते.

दिलीप कुमार यांचे राजकीय विचार त्यांच्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यावर प्रभाव टाकणारे होते. अमिताभ बच्चन, सुनील दत्त आणि राजेश खन्नासारख्या अभिनेत्याप्रमाणे ते कधीही सक्रीय राजकारणात आले नाहीत. परंतु नेहमी राजकारणाशी निगडीत राहिले.

ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवई यांनी काही वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात राजकारणाशी नाळ असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्यांबाबत खूप सविस्तर भाष्य केले होते. या पुस्तकातील एक अध्याय हा बॉलिवूडमधील ट्रेजेडी किंग दिलीप कुमार यांच्याबाबतीतही आहे.

दिलीप कुमार नेहमी पक्के काँग्रेसी विचारधारेचे होते. त्यांचे वडील आणि आजोबा अखंड भारतातील पेशावरमध्ये राहत होते. पेशावर शहर सध्या पाकिस्तानात आहे. ते दोघंही काँग्रेसी होते. लहानपणापासून काँग्रेस विचारधारा दिलीप कुमारांच्या मनात रुजली होती.

दिलीप कुमार सिनेमात आल्याच्या १८ वर्षानंतर ते पहिल्यांदा सार्वजनिकरित्या राजकारणात आले होते. तेव्हा पश्चिम बॉम्बे मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा त्यांनी प्रचार केला होता.

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीतही दिलीप कुमार यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र असं असतानाही राजकारणात त्यांची सर्वपक्षीय मैत्री होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याशीही त्यांची जवळीक होती.

विलासराव हेही दिलीप कुमार यांचे चाहते होते. विलासरावांचा लूकही काहीही दिलीपकुमार यांच्याशी मिळताजुळता असल्याने त्यांना दिलीपकुमार असेही म्हटले जात.

विलासराव यांच्या सूनबाई आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांनी ट्विट करुन विलासराव आणि दिलीप कुमार यांच्या आठवणी जागवल्या आहेत.

विलासराव जेव्हा आपला पांढऱ्या रंगाचा घोडा घेऊन गावात फेरफटका मारायचे, तेव्हा ते पाहा बाभुळगावचे दिलीपकुमार... अशा शब्दात गाववाले विलासरावांचे कौतुक करायचे.

बाभुळगावसारख्या लहानशा खेड्यातही लोकांना दिलीपकुमार यांची भुरळ होती, त्यावरुन दिलीपकुमार यांचा प्रभाव 60 च्या दशकांत गावागावतही होता हे जेनेलिया यांनी सांगितलंय.

दिलीपकुमार यांचा आणि विलासराव यांचा सेम पोझमधील आणि पांढऱ्या रंगाच्या घोड्यासोबतचा फोटो शेअर करत, जेनिलाय डिसुझा यांनी आठवणी जागवल्या आहेत.