'40 दिवसांपासून शिक्षक आझाद मैदानावर, पण सरकारच्या संवेदना बधीर'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 04:36 PM2021-02-18T16:36:57+5:302021-02-18T16:44:59+5:30

राजधानी मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या 40 दिवसांपासून शिक्षक संघटना आणि विनाअनुदानित शिक्षकांनी आंदोलनाची बैठक घातली आहे. मात्र, सरकारच्या एकही प्रतिनिधी किंवा अधिकारी या शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तेथे पोहोचला नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गिरीश महाजन, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आंदोलनास्थळाला भेट दिली. यावेळी तेथील शिक्षकांच्या मागण्या व अडचणी जाणून घेतल्या.

फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर करत, सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने आंदोलक शिक्षकांकडे पाठ फिरवल्यानं संताप व्यक्त केला आहे.

शाळा अनुदानासह इतरही मागण्यांसाठी गेल्या 40 दिवसांपासून शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत. पण, मविआ सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. पूर्वी आंदोलनं झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज तर कुणीही भेटायला येत नाही.

मुळात जो निर्णय आमच्या सरकारच्या काळात झाला आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद सुद्धा झाली, ती केवळ हे सरकार अंमलात आणत नाही, म्हणून शिक्षकांसारख्या घटकावर आंदोलनाची वेळ येणे आणि त्यांना इतके दिवस बसवून ठेवणे हे दुर्दैवी आहे. नुसत्या अंमलबजावणीला सव्वा वर्ष लागतो?

मुंबईच्या बिल्डरांना 5000 कोटी रूपयांची सूट आणि शिक्षकांसाठी 300 कोटी खर्च करायला तयार नाही, हे खेदजनक आहे.

या आंदोलकांची आझाद मैदानावर भेट घेतली, तेव्हा माझ्यासोबत यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, रणजित पाटील उपस्थित होते

विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे आणि शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात यावे, यासाठी शिक्षक आझाद मैदानात बसले आहेत.

गेल्या 40 दिवसांपासून शेकडो शिक्षक येथे बसून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अद्यापही सरकारने यांच्याकडे पाहिले नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शइक्षकांच्या मागणीकडे लक्ष देण्याचं सरकारला सूचवलं आहे