ह्रदयविकाराचा झटका... सीपीआर’ शिकून जीव वाचवू शकता, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:46 PM2023-07-17T13:46:25+5:302023-07-17T13:54:11+5:30

डॉ. नागेश वाघमारे, ह्वदयरोगतज्ज्ञ, बॉम्बे हॉस्पिटल भारतातच काय तर जगभरात हृदयरोगामुळे अनेकजण जीव गमावत असतात. अनेकदा हृदयाचा झटका इतक्या वेगात येतो की त्यात मृत्यू ओढवतो. मात्र, या अशा प्रसंगात हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत जर काही प्राथमिक उपचार मिळाले तर काहीवेळा प्राण वाचण्यास मदत होते.

भारतातच काय तर जगभरात हृदयरोगामुळे अनेकजण जीव गमावत असतात. अनेकदा हृदयाचा झटका इतक्या वेगात येतो की त्यात मृत्यू ओढवतो. मात्र, या अशा प्रसंगात हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत जर काही प्राथमिक उपचार मिळाले तर काहीवेळा प्राण वाचण्यास मदत होते.

काहीवेळा हृदयाचा झटका (कार्डियाक रेस्ट) येतो आणि पटकन प्राण जातो. त्यावेळी हृदयरोगावर गेमचेंजर ठरलेला उपाय म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर). या उपायाने अनेकांचे प्राण वाचले आहेत.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ‘सीपीआर’ येणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी, गोल्डन अवर’मध्ये उपचार आवश्यक आहेत

गोल्डन अवर म्हणजे हृदयाचा झटका आल्यानंतर तत्काळ जे प्रथमोचार ज्या वेळेत रुग्णांना मिळतात त्या वेळेला गोल्डन अवर म्हणतात. अनेक व्यक्तींना या वेळेत सीपीआर दिल्यामुळे रुग्ण बचावल्याच्या अनेक घटनांची नोंद हृदयरोगतज्ज्ञांकडे आहे.

काय आहे सीपीआर? हृदयरोगाचा झटका आलेल्या व श्वास कोंडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो, कारण झटका येतो त्यावेळी त्या संबंधित व्यक्तीचा श्वास कोंडला जातो. त्या व्यक्तीला सर्वसामान्यांप्रमाणे श्वास घेता येत नाही.

या अशा घटनेत त्या व्यक्तीला कृत्रिम ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असते, त्यास सीपीआर असे म्हणतात.

ते कसे द्यायचे? सीपीआर सामान्य माणसांनाही देता येऊ शकते. त्यासाठी अनेक डॉक्टर याचे प्रशिक्षण देत असतात. ते घेणे गरजेचेच आहे. तो देण्यासाठी दोन्ही हातांच्या साहाय्याने छातीवर एका मिनिटात किमान १०० ते १२० वेळा दाब द्यावा. यामुळे काही वेळासाठी रक्ताचे पंपिंग होऊ लागते. रुग्ण शुद्धीवर येत नाही, तोपर्यंत हा दाब देणे गरजेचे आहे.

अनेक रुग्णांना वेळेत सीपीआर मिळाल्यामुळे प्राण वाचले आहेत. हृदयाचा झटका आल्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया बंद पडते. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा बंद होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मेंदूला इजा होत असते. सीपीआर दिल्याने हृदय सुरू होण्यात मदत होते आणि त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होतो.

अनेकदा सीपीआर वेळेत न मिळाल्याने रुग्णाला रुग्णालयात आणले जाते. डॉक्टर उपचार करून हृदय पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतात ते यशस्वी होतात. मात्र काहीवेळा मेंदूला रक्तपुरवठा तीन मिनिटांपेक्षा अधिक काळ न मिळाल्यामुळे मेंदूला इजा होते. त्यामुळे रुग्ण केव्हा ब्रेन डेडही होऊ शकतो.

त्यामुळे हृदयाचा झटका आल्यानंतर सीपीआर मिळणे गरजेचे आहे. त्याचे प्रशिक्षण सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा घ्यावे. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होते. - डॉ. नागेश वाघमारे, ह्वदयरोगतज्ज्ञ, बॉम्बे हॉस्पिटल