"उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढल्यास..."; निरुपमांच्या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 04:22 PM2023-12-29T16:22:00+5:302023-12-29T16:23:09+5:30

काँग्रेसच्या गोटातून माजी खासदार संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर पलटवार करताना आज एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

Uddhav Thackerays Shiv Sena wont win a single seat if it fights on its own says Sanjay Nirupam | "उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढल्यास..."; निरुपमांच्या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता

"उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढल्यास..."; निरुपमांच्या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता

Sanjay Nirupam Vs Sanjay Raut ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच जागावाटपावरून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लोकसभेच्या २३ जागा लढवणार, अशी घोषणा पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या गोटातून माजी खासदार संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर पलटवार केला जात आहे. अशातच आज संजय निरुपम यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. "उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढली तर एकही जागा जिंकू शकत नाही, हे माझं चॅलेंज आहे," असं निरुपम म्हणाले.

जागावाटपावरून संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचा समाचार घेताना संजय निरुपम म्हणाले की, "काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाहीत. शिवसेनेची तर एकही जागा स्वबळावर निवडून येऊ शकत नाही, हे माझं चॅलेंज आहे. त्यांना काँग्रेसची गरज आहे आणि काँग्रेसलाही शिवसेनेची गरज आहे. अशावेळी तुम्ही आव्हानात्मक आणि अहंकाराची भाषा बोलू नका," अशा शब्दांत निरुपम यांनी संजय राऊतांना खडसावलं आहे.

"महाराष्ट्रात निवडणूक लढवायला दिल्लीचे नेते येणार नाहीत"

जागावाटपाबद्दल भाष्य करताना संजय राऊत यांच्याकडून वारंवार सांगितलं जात आहे की, आम्ही या विषयावर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणार नसून काँग्रेसच्या हायकमांडसोबत बैठक करून निर्णय घेऊ. राऊत यांच्या या वक्तव्यावर संजय निरुपम यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. "आमच्या पक्षाचं मुख्य कार्यालय दिल्लीत असून आमचे पक्षश्रेष्ठीही दिल्लीतच आहेत. त्यामुळे जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय दिल्लीतूनच होईल. मात्र तुम्हाला राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल. कारण आमचे दिल्लीतील नेते इथे निवडणूक लढवायला येणार नाहीत. महाराष्ट्रातील नेतेच इथे निवडणूक लढवणार आहेत आणि प्रचार करणार आहेत," असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, "संजय राऊत यांनी अद्याप साधी महानगरपालिकेची निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे आमच्या ज्या नेत्यांनी आतापर्यंत प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे, त्यांना गल्लीबोळातून नेते म्हणून हिणवू नका," अशा शब्दांत संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. 

Web Title: Uddhav Thackerays Shiv Sena wont win a single seat if it fights on its own says Sanjay Nirupam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.