विनोद तावडे, पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार?, राजकीय चर्चांना उधाण, २७ फेब्रुवारीला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 02:12 PM2024-01-30T14:12:33+5:302024-01-30T14:15:01+5:30

Rajyasabha Election 2024: राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे.

There is talk that Vinod Tawde, Pankaja Munde may be sent to Rajya Sabha from BJP | विनोद तावडे, पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार?, राजकीय चर्चांना उधाण, २७ फेब्रुवारीला मतदान

विनोद तावडे, पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार?, राजकीय चर्चांना उधाण, २७ फेब्रुवारीला मतदान

Rajyasabha Election 2024: राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. रिक्त होणाऱ्या ५६ पैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तसेच, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षांकडून पुन्हा या खासदारांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली जाते की इतर कोणाला पाठवले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. 

राज्यसभेसाठी भाजपकडून विविध नावांची चाचपणी सुरू आहे. राज्यातून भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये भाजपाची पुन्हा सत्ता आणण्यात विनोद तावडे यांचा मोठा हात होता.  तर पंकजा मुंडे मागील अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. या निमित्ताने त्यांची नाराजीदेखील दूर करण्याच भाजपचा प्रयत्न असू शकतो. केंद्रीय नेतृत्व लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल

भाजपा : १०४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२. शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ४०,  काँग्रेस : ४५, शिवसेना उद्धव ठाकरे गट : १६ राष्टवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११, बहुजन विकास आघाडी : ३, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ति प्रत्येकी २, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ति, क्रांतीकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष १३... एकूण २८७

महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ संपतोय

- कुमार केतकर, काँग्रेस
- वंदना चव्हाण, राष्ट्रवादी (शरद पवार गट)
- प्रकाश जावडेकर, भाजप
- मुरलीधरन, भाजप
- नारायण राणे, भाजप
- अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट)

Web Title: There is talk that Vinod Tawde, Pankaja Munde may be sent to Rajya Sabha from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.